#31
1) बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवा.
- बाळ वर्षात जन्माच्या तिप्पट वाढते.
- वर्षाला केला त्याला नउ किलो वजनदार म्हणून मोठेपणी तो झाला रुबाबदार फौजदार.
- बाळाची वाढ हे आरोग्याचे मोजमाप आहे.
- वाढीचा तक्ता हा प्रत्येक बालकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
- बाळाच्या एका वजनापेक्षा वाढीची दिशा महत्वाची असते.
- त्याचे वजन आरोग्याच्या मार्गावर ठेवा.
- पाच वर्षापर्यंत दंडाचा घेर १४ से.मी. पेक्षा कमी = उपासमार.
- वाढीची इंजक्शने व टॉनिकच्या बाटल्या दिल्याने डॉक्टर चे वजन वाढते, बाळाचे नाही.
- पहिल्या वर्षी, लागोपाठ दोन महिने वजन वाढ़ले नाही, तर काहीतरी बिघडले आहे असे समजावे.
- बाळ ३ वर्षाचे होईपर्यंत दर महिन्याला वजन करा.
- आजारात उतरलेले वजन वाढल्यावरच आजार बरा झाला असे समजावे.
- आजारात उतरलेले वजन वाढेपर्यंत नेहमीपेक्षा एक वेळ जास्त खाऊ घाला.
- आजारी बाळाची भूक कमी झाल्यास थोडे थोडे जास्त वेळा खाऊ घालावे.
- शाररिक व मानसिक वाढ़ीसाठी बोला खेळा व प्रेम दाखवा.
- वजनाने महिन्यांचा आहार कळतो, उंचीने वर्षाचा आहार कळतो.
- मराठी माणसाच्या पोटी दारासिंग कसा जन्माला येणार ? तो तुमच्यासारखाच राहणार.
२). जुलाब, डीहायड्रेशन, पाणी
- शरीरातील पाणी कमी झाले तर डीहायड्रेशन होते.
- फुलांसारखी मुलेही पाण्यावाचून कोमेजतात.
- जुलाबाच्या मुलाला डीहायड्रेशनमुळे जीवाचा धोका होऊ शकतो.
- तहान हे डिहायड्रेशनचे पहिले लक्षण आहे.
- जेवढे पाणी जुलाबातून बाहेर जाईल तेवढे तोंडाने पाजायला हवे.
- जुलाबाच्या बाळाला अंगावरचे दूध चालू ठेवा.
- जुलाब सुरु झाल्याझाल्या एक ग्लास पाणी, एक चिमूट मीठ, एक चमचा साखर थोडे थोडे सारखे पाजा.
- दर दहा मिनिटांनी पाच चमचे मीठ साखर पाणी हा जुलाबाच्या बाळाला योग्य सल्ला आहे.
- मीठ, साखर, पाणी वापरून डीहायड्रेशन टाळा.
- ओ.आर.एस. वापरून डीहायड्रेशन बरे करा.
- जुलाबाचे बाळ म्हणजे गळकी लागलेला माठ आहे.
- बाहेर गळण्याच्या प्रमाणापेक्षा जलद गतीने पाणी भरा.
- जुलाबाची औषधे फक्त डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या.
- जुलाबाची औषधे उपायांपेक्षा अपायच जास्त करतात.
- जुलाबाच्या बाळाचे अन्न, पाणी तोडणे ही सर्वात वाईट ट्रीटमेंट आहे.
- दिवसातून दोनदा, ओल्या फडक्याने फरशी पुसून घेण्याने जुलाब टाळता येतात.
- त्याच्या तोंडात जाणारी प्रत्येक वस्तू स्वच्छ हवी.
- जनावरांची विष्ठासुद्धा संसर्गजन्य आजार पसरवते.
- उपासमार टाळून जुलाब टळतात.
- जुलाब टाळून उपासमार टळते.
- जुलाबाचे बाळ बरे झाल्यानंतर एक आठवडा नेहमीपेक्षा एक वेळ जास्त खाऊ घाला.
- खाण्याआधी, संडासनंतर हात धुवा.
- साथीचे जुलाब टाळण्यासाठी
१) अंगावर पाजा
२) गोवर लस द्या.
३) संडासचा वापर करा.
४) अन्न व पाणी स्वच्छ ठेवा.
५) हात धुवून अन्नाला स्पर्श करा.
६) माशांचा नायनाट करा.

3) फक्त स्तनपान
- बाळ जन्मल्यानंतर शक्य तितक्या लगेच अंगावर पाजा.
- पहिले चार ते सहा महिने फक्त अंगावर पाजा .
- वरचे काहीही नको .
- एक बाजू पूर्ण रिकामी झाल्यावर दुसऱ्या बाजूला पाजावे .
- सुरुवातीला येणारे दूध ( FORE MILK ) पातळ असते ,
- त्याने बाळाची तहान भागते ,
- नंतर येणारे दूध ( HIND MILK ) घट्ट असते
- त्याने बाळाची भूक भागते .
- स्तनपान द्या निपलपान नको .
- अंगावर ओढताना बाळाचे तोंन्डाचा “ आ “ असावा “ ऊ “ नको .
- आंबा चोखल्याची अँक॒शन हवी
- स्ट्रो ने कोल्डड्रिंक पिल्यासारखे नको .
- सर्वच आया यशस्वी स्तनपान करू शकतात.
काही आयांना मदतीचा हात लागतो. अंगावरचे दूध नैसर्गिकपणे सुटते. दुध वाढवण॒यासाठी नैसर्गिक मार्ग वापरा.
अंगावरचे दुध वाढवणा-या गोष्टी
१) वारंवार चोखणे
२) वारंवार रिकामे करणे
३) चांगला आहार
४) कमी काळजी.
- औषधोपचार नको.
- दीड वर्ष अंगावर पाजा.
- अंगावरचे दुध जाणे हे आईचे नाही तर तिच्या सल्लागाराचे अपयश आहे.
- अंगावरच्या दुधाचे बाळ निरोगी असते.
- बाळ मागेल तेव्हा पाजा.
- घडयाळाप्रमाणे बाळ लावू नका.
- बाळाप्रमाणे घड्याळ लावा.
- आजार किंवा कमी वजनामुळे अंगावर ओढ़ू न शकणा-या बाळाला,
- दूध पिळून काढ़ून चमच्याने पाजावे.
- अंगावरचे दुध कमी पडल्याचे निदान डॉक्टरांनी करावे,
- आईने व आजीने नव्हे.
- योग्य प्रकारे न पाजल्याने स्तनाग्रांना इजा होते.
- गर्भारशिणीने चार ते सहा महिने अंगावर पाजायला हरकत नाही.
- गर्भारशिणीचे दूध दूषित नसते.
- माहिती आणि इच्छा असेल तर कामावर जाणारी आई सुद्धा
- फक्त अंगावरच्या दुधावर बाळ मोठे करू शकते.
- अंगावर पाजणा-या आईच्या स्तनातील दुखरी गाठ
- म्हणजे तातडीने बरी करण्याची बाब आहे.
- दुध पिळून काढून स्तन मोकळे करणे हा महत्वाचा इलाज आहे.
- अंगावरचे दुध पिळून ठेवायला थंड जागी आठ तास चालते.
- रेफ्रिजरेटरमध्ये बारा तास चालते.
- आईच्या तोंडाला कुलूप म्हणजे तुमच्या नातवाच्या तोंडाला कुलूप.
- अंगावर पाजणाऱ्या आईला कोणताही आहार वर्ज्य नाही.
- अंगावर पुरेसे दूध असल्यास
१.पान्हा फुटतो.
२.वजन वाढते ३.बाळ छान झोपते.
४.सात आठ वेळा संडास होते.
५.दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा लघवी होते.
- देव दिसला तरच नमस्कार करीन असे आपण म्हणत नाही.
- नमस्कार केला त्तर देव तिथे येतो.
- तसेच दूध आल्यावर पाजीन असे म्हणू नये, पाजल्यावर दूध येतेच.
- बाळाच्या किंवा आईच्या कोणत्याही आजारात,
- अंगावरचे दूध तोडणे हे ‘पाप’ आहे.
- बाटलीने, वरच्या दुधाने जुलाब होतात.
- अंगावर पाजल्याने जुलाब टळतात.
- अंगावर पाजल्याने पुढची पाळी आणि पाळणा दोन्हीही लांबतात.
- अंगावर पाजल्याने बाळाची प्रतिकार शक्ती वाढते.
- आईच्या दुधात कधीच दोष नसतो.
4) बाटली पुतनामावशी आहे.
- बाटली बाळाची शत्रू आहे. बाटली पुतनामावशी आहे.
- बाटलीच्या तोंडी बाळ म्हणजे शत्रूच्या तोंडी बाळ.
- बाळ किंवा बाटली एकावरच प्रेम करा.
- ‘बाळ रडले म्हणजे अंगावरचे कमी पडले’ असा अर्थ घेऊ नका.
- बाटलीने पाजणे सोईचे नाही,
- अंगावर पाजणे सोईचे आहे.
- बाटलीने वरचे दुध पाजलेली बाळे आजारी पडतात, सिरीयस होतात, मरणहि पावतात.
- “बाटलीने दूध” म्हणजे बाटलीने वरचे दुध, दोन्हीही वाईटच.
5) वरचे दूध नको.
- दुध म्हणजे पूर्णान्न नाही.
- दूध हे पातळ अन्न आहे.
- बाळाच्या दुधात पाणी म्हणजे बाळाची अजून जास्त उपासमार .
- ग्लासभर दुधात ग्लासभर पाणी आणि अर्धा चमचा खवा असतो.
- भरपूर दूध पिल्याने बाळाचे पोट भरते, आईला समाधान वाटते, बाळाची उपासमार होते.
- गायीचे बाळ म्हशीचे दूध पीत नाही. म्हशीचे बाळ शेळीचे दूध पीत नाही. सिंहाचे बाळ
- वाघाचे दूध पीत नाही. फक्त माणसाचे बाळ इतर जनावरांचे दूध पिते.
- नॉट मेड फ़ोर ईच अदर.
- लोणी खाल्याने श्रीकृष्ण होतो. दूध पिल्याने पेंद्या होतो.
- दुधपित्या बाळामागे डॉक्टर लागतो, जेवत्या बाळामागचा डॉक्टर सुटतो.
- दूध पिल्याने पोट भरते, बाळ कमी जेवते.
- दूधपित्या मुलांना अन्नाचा चोथा कमी पडतो, संडासला खडा होतो.
- दुधातल्या प्रोटीनच्या अँलर्जीने आतड्यातून अदृश्य रक्तस्त्राव होतो.
- मुले निस्तेज, फिकी, अँनिमिक होतात.
- त्यांचा स्वभाव किरकिरा होतो.
- दुधाची सवय लागते. दारुसारखी.
- खात्यापित्या घरची मुलं अती दुधामुळे कुपोषित, खुरटलेली असतात.
- दूध पावडर वापरणे कठीण आहे. ३० मिली पाण्यात १ सपाट चमचा पावडर टाका .
6) मुलांना अन्न लागते.
- अंगावरच्या दुधाला मदत म्हणून सहाव्या महिन्यात कांजी,
- नवव्या महिन्याला खिचडी व वर्षाच्या वाढदिवसाला आपल्या ताटात बसून जेवण हवे.
- चांगल्या बालआहाराचे सहा नियम पाळा.
१) दोन वर्ष अंगावर पाजा.
२) सहाव्या महिन्याला कांजी द्या.
३) कांजित प्रथिने घाला.
४) कांजित फळे किंवा भाजी घाला.
५) दिवसातून चार वेळा कांजी द्या.
६) आजारी बाळाला अन्न द्या.
- चांगल्या बालआहाराचे सहा नियम सर्व आयांनी पाळले तर मुले कुपोषित होणारच नाहीत.
- बाळाच्या कांजीत तेल किंवा तूप घाला.
- बाळाचे अन्नं कुस्करलेले – पेजसारखं हवे.
- चमचा तिरका केल्यावर ते वाहून जाऊ नये.
- लहान बाळाला त्याच्या स्वतःचि वाटी व चमचा हवा.
- लहान बाळांना बसवून चमच्याने खायला घालावे, पाणी पाजावे, झोपवून नको.
- लहान मुलांचे पोटही लहान असते. त्यांना पाच वेळा खाऊ घाला.
- थोडे थोडे जास्त वेळा खाऊ घाला
- मुलांना स्वतःच्या हाताने खायला मदत करा.
- मुलाच्या तोंडाचे कुलूप आईच्या हाताच्या किल्लीने उघडत नाही, स्वतःच्या हाताच्या किल्लीने उघडते.
- वरण, भात, भाजी, भाकरी इळातून चार बार हेच आहारशास्त्राचे सार.
- मिश्र आहार दर्जेदार असतो.
- दुध पावडर अन्नात कालवून खाऊ घाला.
- उपासमार झालेल्या मुलांची भूक मरते.
- आजारातून उठण्यासाठी आणि वाढ़ीसाठी जास्त प्रथिनांचा ( शेंगदाणे , फुटाणे , उसळ , डाळी ,अंडी , मटन , मासे ) पुरवठा आवश्यक आहे.
- पुरेसे उष्मांक देणा-या आहारात पुरेशी प्रथिने असतातच.
- फळे व भाज्या जीवनसत्वे व खनिजे देतात. म्हणून त्यांना प्रतिकारशक्ती वर्धक आहार म्हणतात.
- फसफस-या पेयात अन्नघटक काहीच नसतात.
- सर्व आजारांचा आळ अन्नावर घेऊ नका.
- बिनखिशाचा शर्ट नको, बिन खाऊचा खिसा नको .
- शालेय विद्यार्थ्यांना डबा आणि न्याहरी आवशक आहे.
- घरातले अन्न मुलांच्या हाती लागेल असे ठेवा.
- खाण्याची जबरदस्ती केल्याने नवे प्रश्न निर्माण होतात.
- जेवण या विषयावर आईचे व मुलाचे भांडण नसावे प्रेम असावे .
- त्याला पाहिजे ते, त्याला पाहिजे तेव्हा , त्याला पाहिजे त्तितके, द्यावे. आईला पाहिजे ते,
- आईला पाहिजे तितके, आईला पाहिजे तेव्हा नको.
- सवय लावली तर नऊ महिन्याचे बाळ स्वतःच्या हाताने बटाटावडा खाते सवय नाही लावली
- तर ५ वर्षाचे मूल आईच्याच हाताने दूधभात खाते .
- तो खात नाही म्हणून मी देत नाही असं म्हणून कसं चालेल ?
- व्यवस्थित न जेवणे हा सवयीचा प्रश्न आहे, भुकेचा नाही.
- मुलांनी दिवसभर कोंबडीच्या पिलासारखे दाणे टिपत राहावे
- वजन कमी करायचे असेल तर निम्मेच खा.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

