“पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा!”
हा बालविकासाचा नवा मंत्र आहे.
बाळांनी झोपावं पाठीवर, खेळावं पोटावर. याला “पालथा खेळ वेळ”, Tummy Time म्हणतात.
पालथा वेळ – कधी सुरू करावा?
बाळ जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासूनच पालथा वेळ सुरू करता येतो.
आईच्या पोटावर, छातीवर – स्तनांच्या मध्ये बाळाला सुरक्षित व मायेने पालथं ठेवून सुरुवात करता येते.
हे बाळाला आवडतं, कारण त्याला आईचा उबदार स्पर्श, नजरेचा संपर्क आणि आवाज मिळतो.
ही जवळीक बाळात विश्वास, प्रेमाची जाणीव, आणि संवेदनशील परस्परसंवाद निर्माण करते.
पालथा वेळ का महत्वाचा आहे?
१. मेंदूला चालना मिळते
- बाळाला पालथं ठेवल्याने रेटिक्युलर अॅक्टिव्हेटिंग सिस्टीम (RAS) सक्रिय होते.
- यामुळे जागरूकता, संवेदनक्षमता, आणि नजरेचा संपर्क वाढतो.
२. स्नायू बळकट होतात
- मान, खांदे, वरचा धड यांचे स्नायू मजबूत होतात.
- बाळाला डोके धरता येते, आणि नंतर उलटणं, सरपटणं, बसणं, उभं राहणं शक्य होतं.
३. डोक्याचा सपाटपणा टाळतो
- सतत पाठीवर झोपल्याने होणारा डोक्याचा चपटेपणा (Plagiocephaly) टाळता येतो.
- डोक्याचा नैसर्गिक आकार टिकतो.
४. श्वसन सुधारते.
- डायाफ्रामचा वापर, छातीची हालचाल, आणि पोटाचे स्नायू सक्रिय होतात.
- त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते.
५. दृष्टी आणि समन्वय सुधारते.
- बाळाचे डोळे आईच्या हालचालींना अनुसरून फिरतात – visual tracking.
- वस्तूची जवळ–दूर अशी खोली समजते – depth perception.
- डोळे–हात समन्वय विकसित होतो.
६. शरीराबाबतची जाणीव वाढते
- जमिनीशी संपर्कातून बाळाच्या हातांना स्पर्श, सांध्यांची जागरूकता मिळते.
- सूक्ष्म हालचालींची तयारी होते – उदा. खेळणी पकडणे.
७. भावनिक विकासास हातभार
- झोपेचं चक्र, भावनिक समज, आणि स्वतःला शांत करण्याची क्षमता याचा विकास होतो.
- पालथा वेळ बाळाला शांत, सावध, आणि सहभागी बनवतो.
८. विकासातील अडथळ्यांपासून संरक्षण
- टम्मी टाइम न दिल्यास:
बाळ उशिरा उलटतं, बसतं, उभं राहतं
डोकं चपटं होऊ शकतं
हात-खांद्यांचा समन्वय कमी होतो
९. भविष्याच्या विकासाची पायाभरणी
- सतत हालचालींमुळे मेंदूतील जाळ्या (synapses) निर्माण होतात.
- यामुळे शारीरिकच नव्हे तर बौद्धिक क्षमता विकसित होतात.
पालथा वेळ – किती आणि कसा द्यावा?
- दिवसातून ३–४ वेळा, प्रत्येक वेळी २–५ मिनिटांनी सुरुवात करा.
- बाळ आनंदी असेल तर वेळ हळूहळू वाढवा – प्रत्येक महिन्याला ५–५ मिनिटे.
- बाळ रडू लागले की थांबा – हे खेळ असावे, शिक्षा नाही.
- झोपेच्या वेळी मात्र नेहमी पाठीवरच ठेवा.
- बाळाला पालथं ठेवून एकटं कधीही सोडू नका.
- रंगीत खेळणी, आवाज, स्पर्श यांचा वापर करा.
- हातावर उभे राहायला मदत करणारी खेळणी ठेवा.
दिवसातून काही मिनिटांचा हा पालथा खेळ वेळ,
बाळाच्या आयुष्यात मोठा फरक घडवतो!
हे खेळाच्या रूपात करा.
बाळाच्या जवळ रहा, संवाद साधा, हसा, गा, प्रेम द्या!
तुमचं बाळ हसतं, खेळतं, बळकट होतंय हे अनुभवणं हीच सर्वात मोठी भरभराट आहे!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


