#45 प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती आहे
मित्रांनो, तुम्ही दैदिप्यमान, यशवंत, कर्तृत्ववान, आहातच. ते तर तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केले आहेच.
आता लक्ष घालावे, स्वतः सज्जन होण्यावर.
जागरुक, विश्वासार्ह, कामाचा माणूस बनण्यावर. ॥ १ ॥
नवीन काहीही, निर्माण करायचे असेल
तर नव निर्मात्याला, कष्ट, त्रास हे होणारच
निर्मितीला अचानक, अडकाठी आली तर
मुकाट्याने ती, सहनही करावी लागणार
जन्माच्या आधी, फुलपाखरू तयार होणार
अंड्याच्या कठीण कवचाच्या, कोंडवड्यातच
अशा कठीण परिस्थितीत, परीक्षेच्या काळी
जाणीवपूर्वक, विनयाने वागा, अशा वेळी ॥ २ ॥
ज्याच्या जे मनात,तसे प्रत्यक्षात घडणार
नैराश्यग्रस्त मनात,आनंद कसा येणार
उत्साही माणसाला,जग रंगीत दिसणार
उदासीन माणसात,उत्साह कुठून येणार ॥ ३ ॥
आधी स्वतःची, स्वतःवर, जबाबदारी घ्यावी
नंतर इतरांची, समाजाची, जगाची घ्यावी
आपले यश कष्टाने, आपणच मिळवावे
दुस-या कुणी, का, आयते पदरात टाकावे
आत्मविश्वासाने भीड, हाती घेतल्या कामाला
‘हे तर मी सहज करेन’, ध्येय असायला ॥ ४ ॥
ध्येयाच्या आड येतात, अनेक मोह मायावी
वेळीच ‘नाही’ म्हणायची, धमक मात्र हवी
ज्ञानाच्या प्रकाशात, जो उजळून तळपतो
अज्ञानाचा अंधार, तो मनात कुठे उरतो
अशा स्वयंप्रकाशी व प्रेरित व्यक्तिमत्त्वाला
कोण येणार नाही, आदराने सुस्वागताला ॥ ५ ॥
तरुणाईच्या उर्मी, उर्जेत, जोशाच्या काळात,
सर्वांना अपार कष्टच, करावे लागतात
नुसती रिकामी, दिवास्वप्नंच जे बघणार,
अशांचा कधी, कुणाचा, झाला आहे बेडा पार
ज्याचा स्वतःवर अटळ असा विश्वास आहे,
त्यालाच ठरवेल ते करता येणार आहे ॥ ६ ॥
शिकायचेच आहे, त्याला अडचण नसते
इच्छा व प्रयत्नांना हमखास यश मिळते
कष्टाने, नेमलेला अभ्यास, संपूर्ण करावा
एकचित्ताने समर्पित होऊन तो करावा
हाती काम आणि डोकी ज्ञान, अभाग्या मिळेना
माणूस का म्हणावे, त्याला जनावर म्हणाना ॥ ७ ॥
जगात संस्कारी, आदर्श माणसे असतात
त्यांच्या संपर्कात राहून, जपा आपले हित
गुणी लोकांकडे शिका, त्यांना आनंद होईल
त्यांचे आचार विचार, सर्वांचे भले करेल
तन, मन, धन, सर्वस्व, कामात झोकून द्या
आपल्या कर्तृत्वाचा फायदा, सर्वांना होऊ द्या ॥ ८ ॥
लहानपणी, कौशल्य व ज्ञान, कसे असेल
वडिलांच्या जबाबदा–या, कशा पेलवतील
शिस्तबद्ध, अभ्यास करा, काम करा, कष्टाने
वेळीच, गुरु येई, मार्ग दाखवाया नेटाने
मनापासून, निष्ठेने,धरा शिक्षणाची, आस
कधी येणार नाही, अपयश ते, आसपास ॥ ९ ॥
आवडते काम, जो मन लावून करणार
आयुष्यभर यशस्वी, सुखी व धन्य होणार
जितकं सखोल ज्ञान, आणि प्राविण्य, मिळालं
स्थळ, काळ, वेळ, भानच सगळं हरपलं
तहान भूक हरपून, विसरा राग लोभा
मन तरंगायला लागेल आनंदाचे डोहा ॥ १० ॥
पंचेंद्रिये, जगाची ओळख, मेंदूला देतात
चूक काय, बरोबर काय, माहिती देतात
ज्ञानाची, जिज्ञासा, निर्माणच, करावी लागते
आजची, गरज बघून, मिळवावी लागते
धैर्याचे पुढचे पाऊल, यशो शिखरी पोचे
चणे खावे लोखंडाचे, तेंव्हा ब्रम्हपदी नाचे ॥ ११ ॥
चौकसपणाने, कणाकणाने, ज्ञान वेचावे
मौल्यवान आयुष्य, ज्ञानाविना, वाया, न जावे
मनाला, हळूहळू, योग्य वळण, लागणार
उजळणीने, दडलेला अर्थ, उमजणार
सज्जनांच्या, संगतीतच, खरी, समज येते
लोखंडाचेही, परिसाच्या स्पर्शाने, सोने होते ॥ १२ ॥
पुस्तकी ज्ञानाने, जगाची ओळख, होत नाही
केल्याने, जे होत आहे, ज्ञानाने ते, होत नाही
गाईड वाचून, शिकण्याचा मार्ग, खरा नाही
‘दहा दिसात, फाडफाड इंग्लिश,’ खरे नाही
शिकायचे असेल, तर, पाठ्य पुस्तक हवे
शिक्षकाचे, बोट धरूनच, चालायला हवे ॥ १३ ॥
पळा, पळा, कोण पुढे पळे, तो धापा टाकेल
यश मिळाल्यावर, त्याला, ‘ग’ ची, बाधा होईल
स्वतःला कधी, ‘सर्वशक्तिमान’, समजू नये
सामाजिक जाणीवेने, व्यवहार करणारे
हिंमत वाढवाया, साथीला, असलेले बरे ॥ १४ ॥
माहितीच्या शस्त्राने, लुबाडणूक बरी नाही
ज्ञानाचा दुरूपयोग, शिक्षणाचे ध्येय नाही
खरे शिक्षण, हे, योग्य वागायला, शिकवते
चांगले शिक्षण, हे, स्वनियंत्रण शिकवते
मिळाल्या, शिक्षणाचा, सर्वांना, उपयोग व्हावा
असा उपक्रम, हाती घ्यावा, पूर्णत्वास न्यावा ॥ १५ ॥
आपल्या आवाक्या, बाहेरही, गोष्टी घडणार
बना आपण, आपल्या जीवनाचा, शिल्पकार
स्वतःची यशोगाथा, स्वतःच हवी, लिहायला
दुस-यावर विसंबला, कार्यभाग बुडाला ॥ १६ ॥
धरतीवर, जमिनीखाली, आणि आकाशात
ज्ञानाची भांडारे, भरली आहेत, काठोकाठ
त्याची रहस्ये, गुरूशिवाय, कुणा समजेना
पण आजकाल, गुरूला, कुणीच, विचारेना
शिक्षक प्रसन्न झाला, तरच ज्ञान मिळेल
तो शिकण्याचे, अनेक, छान मार्ग, शिकवेल ॥ १७ ॥
जग चालवणारा, लाखोंचा पोशिंदा, तो कोण
सृष्टी, सचेतन करणारा, आहे तरी, कोण
मनाच्या आतली, प्रेरणा, ती कुणाला, दिसेना
स्फूर्ती देणारी भावना, ओळखायला येईना
प्रेरणा, ही, चांगल्या कामामागची, शक्ती आहे
तिची, जोपासना करणेही, गरजेचे आहे
जग काय म्हणेल, याची, उगा चिंता, सोडावी
मनातले ऐकून, आनंदाची, वाट धरावी ॥ १८ ॥
यशस्वी विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


