मी एक ‘चांगला माणूस’ बनेन.
माझा मीच ठरवून चांगला बनेन.
हाताला काम असेल, डोक्यात ज्ञान असेल — तोच खरा माणूस. नसेल, तर तो फक्त सजीव. चांगलं व्हायला शिकावं लागतं. चांगलं वागायलाही शिकावं लागतं. रोज थोडं थोडं ठरवून चांगलं वागत गेलो, तर आयुष्य सुंदर होतं. हे अजिबात कठीण नाही — अगदी सोपं आहे!
कुटुंब हीच आपली खरी ताकद असते.
कुटुंब म्हणजे आपल्या माणसांचं बंध, आपुलकी आणि आधार. फक्त रक्ताचं नातं म्हणजे कुटुंब नाही. जसे आहेत तसे एकमेकांना आपलं मानणं,
जुळवून घेणं, हेच खरं कुटुंब.
कुटुंबासाठी जगावं. कौटुंबिक जीवन समाधान आणि शांती देतं. कुटुंबाशिवाय जीवन म्हणजे मुळापासून अलग झालेलं झाड — उखडलेलं रोप.
रोजच्या साध्या साध्या गोष्टींनी आपण चांगले होतो.
घरात सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत जेवणं. जेवण तयार करणाऱ्याला “वा, मस्त!” अशी दिलेली दाद. घरातल्या स्त्रियांशी सन्मानाने वागणं,
सर्वांशी आपुलकीने बोलणं.
तिरकस, कुजकट बोलणं टाळणं. भांडणं न करता — समजूतदारपणानं वागणं.
घरातली कामं आनंदानं करणं.
या साध्याच साध्या गोष्टी चांगला माणूस बनवतात. त्यासाठी ना मोठं तत्वज्ञान लागतं, ना अध्यात्म.
संवाद, सन्मान आणि संयम समृद्ध कौटुंबिक जीवनाची त्रिसूत्री.
कुटुंब म्हणजे संवाद. घरातल्या माणसांशी नम्रतेने बोलावं.
खेकसून बोलल्याने शब्द संपतात, पण मन ओरखडून जातं. योग्य वेळ, योग्य शब्द, योग्य प्रमाण — हाच संवादाचा मंत्र. मनातला राग, स्वार्थ, मत्सर, अहंकार — हे संसार उध्वस्त करतात. त्यामुळे कुणाला ओरबाडून काही मिळवण्याचा हव्यास नको.
मी, कुटुंब आणि मग दुनियादारी
प्रथम मी स्वतःची जबाबदारी ओळखावी. मग कुटुंबाची. आणि मग समाजाची. दुनियादारी म्हणजे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रसंगी त्याग करणं. स्वतःच्या वागणुकीवर लक्ष देणं. सज्जन माणसांच्या सहवासात राहणं. घरात प्रेम, संयम आणि समंजसपणा असेल, तर बाहेरच्या जगात वागणं सोपं आणि सहजसाध्य होतं.
“मी, माझं, मला” करत राहिलो, तर दुसऱ्याला आपलं कसं म्हणणार?
कुटुंबसंस्था हे आपल्या भारतीय संस्कृतीचं सर्वात मोठं बलस्थान आहे. ती पूर्वापार लाभलेली अमूल्य देणगी आहे.ती समजा, आणि जीवापाड जपा. हेच खरं — मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


