शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” ही एक गंभीर समस्या आहे. लक्ष ठेवा बरं का!
मुलांच्या भोवतीचं सामाजिक वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक आहे की हानीकारक आहे हे कुणी तरी जबाबदारीनी बघावं लागतं. मुलांसंबंधी एखाद्या गोष्टीसाठी बरेच लोक जबाबदार असल्यावर, कुणीच जबाबदारीने वागत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवतात. नुकसान मुलांचे होते. कधी कधी कायमस्वरूपी होते. गंभीर होते. दुर्दैवी देखील होऊ शकते. मोठी समंजस मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन, पालक, संबंधित डॉक्टर यांना समस्येबद्दल परिपूर्ण माहिती व जागरूकता असायला हवी.
‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण टोचते.
‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण खोलवर टोचते. मुलांचं मन दुखावते. आत्मविश्वास खचवते. त्यांचं हसणं, खेळणं, शिकणं सगळंच बिघडते. छळवादी दांडगाई’ चे शिकार आणि शिकारी दोन्ही मुलेच असतात. दोघांच्याही कडे लक्ष देण्याची गरज आहे.
छळ म्हणजे साधं भांडण नाही, साधी चिडवाचिडवीही नाही.
तो मुद्दाम, सहेतुक, वारंवार, आणि एखाद्यालाच लक्ष्य करून केला जातो — त्याला त्रास द्यायचाच हेतू असतो.
`छळवादी दांडगाई’ चे प्रकार.
१) शारीरिक छळ.
मारहाण, ढकलणे, वस्तू फेकणे, शारीरिक इजा.
२) शाब्दिक छळ.
नावं ठेवणे, उपहास, चिडवणे, टोमणे, धमक्या, शिव्या, छेडखानी, अश्लील बोलणे.
३) मानसिक सामाजिक छळ.
चिडवणे, दुर्लक्ष करणे, एकटा पाडणे, सामूहिक बहिष्कार, अफवा पसरवणे, इतरांना भडकवणे.
४) सायबर छळ (सायबरबुलिंग)
मोबाईल, सोशल मीडिया, मेसेजेस, ई-मेल अपमान, धमकावणे, फोटो, व्हिडिओ दुरुपयोग.
५) गंभीर गुन्हे.
रॅगिंग, लैंगिक, गटाने, शस्त्राने हल्ला, ॲसिड हल्ला. हुंडा यांच्यात मुलांचा सहभाग.
मुलं अशी का वागतात
कारण त्यांना चांगले वागावे चुकीचे वागू नये हे कुणी कधी शिकवलेच नसते. ना घरी ना शाळेत. त्यांनी अशी वागणूक पाहिलेली असते. अनुभवलेली असते. “हे चुकीचं आहे” असं त्यांना कुणी सांगितलेलंच नसतं.
‘छळवादी दांडगाई’ बाबत शंकेखोरच असायला हवे”
दर तीन मुलांपैकी एकाला छळवादी दांडगाईचा अनुभव आलेला असतो. मुलींना सुद्धा. इतकी या समस्येची व्याप्ती मोठी आहे. एक सडका आंबा अख्खी अढी नासवतो. दोनचार गुंड पुंड एकत्र येऊन लांडगे झाले, की ते दहा बारा कोकरांपैकी कुणाला तरी एकटे पाडून लक्ष्य करू शकतात. बाकीचे प्रेक्षक होतात. किंवा सहभागी होतात.
मूल`छळवादी दांडगाई’ चा शिकार असल्याचा संशय यायला हवा. मुलांचं जेवण, वजन, झोप, बोलणं, वागणं अचानक बदलतं. डोकं दुखतं, पोट दुखतं, उलट येते अशी वारंवार तक्रार येते. पण तपासण्यात काहीच आजार सापडला नाही तर समजावं, कारण मानसिक आहे. दडपण आहे. ताण तणाव आहे. छळवादी दांडगाईची डॉक्टरांना शंका यायला हवी. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान.
वर्गात गटबाजी, टोमणे, सामाजिक सुसंवाद यावर शिक्षकांचे लक्ष द्यायला हवे. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान.
मूल जर वारंवार शाळेत जायचं नाही, तो मला त्रास देतो. असं म्हणत असेल. गप्प गप्प, एकटा रहात असेल. घाबरलेला, भेदरलेला वाटत असेल तर पालकांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. मुलांशी बोला. बोलतं करा. मित्र, खेळ, वर्गातील, दिवसभरातील घटनांबाबत गप्पा मारा. काहीतरी सूचक सापडतेच. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान.
छळवादी दांडगाई थांबवली पाहिजे. दुष्परिणाम टाळायला पाहिजे.
छळ सहन करणारी मुलं स्वतःला कमी लेखतात. स्वतःमध्ये गुरफटून जातात. त्याला शाळा, माणसं नकोशी वाटतात. बालपण हरवतं. ते एकटे पडतात. कधी कधी आत्महत्येपर्यंतही विचार जातात.
आणि छळ करणाऱ्या मुलांना वाटतं की तेच स्ट्राँग, गटनायक हिरो आहेत. त्यांना गुंडगिरी करण्याचा निसर्गदत्त हक्क आहे. दुर्लक्ष झाले तर पुढे जाऊन ते गुन्हेगारीकडेही वळू शकतात. ग्रुपचा गट. गटाची गँग. गँगची कंपनी होऊ शकते. उशीर झाल्यावर चुकीची संगत लागली म्हणून चालत नाही. जागरूकता, सतर्कता, हा एकमेव मार्ग आहे.
जागरूकता आणि संशयाचं तीक्ष्ण भान — हाच एकमेव उपाय!
छळवादी दांडगाई थांबवा. बालपण वाचवा.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)



Anil ,
Khup sunder.
Your understanding of problems is extraordinary. You have God gifted mind to assess and expect the situation with solutions.
My best wishes to you and 🙏🙏.
Dr. Vasant Dhamal (Pune).
It is so so wonderful and eye opener article.My child is facing the same problem . thank you so much for this scientific explanation.