बरोबर आहे, एकुलता एक आहे नं ! डोक्यावर बसणारच. मुलाच्या कोणत्याही समस्येला ‘एकुलता एक’ हे कारण सर्रास दिलं जातं. एकच मुल असणं खरचं इतक चुकीचं आहे का ? एकच मुल असणं चुकीचं नाही. एकुलती एक मुलं इतरांपेक्षा वेगळी नसतात. हे पुराव्यानिशी सिध्द झालं आहे. कृष्णाच्या सात बहिणी कंसाने मारल्या अन तो एकुलता एक राहिला. कृष्णाच्या व्यक्तीमत्वात तर काही दोष राहिले नाहीत ना ? एक सुभाषितही आहे. “देवा, अनेक मुर्ख मुलांपेक्षा एकच पण गुणी मुलगा मला दे ” अनेक तारका नाही तर एक चंद्रच रात्रीचा अंधार नाहीसा करू शकतो. एका धर्मग्रंथात म्हटलं आहे की ‘भावापेक्षा मित्र बरा. भाऊ हिस्सा घेतो, मित्र हिस्सा देतो’. साहित्य पुराणाचं जाऊ द्या, विज्ञान काय म्हणतं बघू. कौटुंबीक मानसशास्त्राचं मत बघू
आजचा कल एकच मुलाचा :-
तीन चार पिढ्यांचे, पंधरा वीस जणांचे, वाडा, अंगण, तुळशी वृंदावन, गोठा, दुभत्या जनावारांसह नांदणारे गोकुळ आता इतिहासजमा झाले. हम दो, हमारे दो, ब्रँड चौकोनी कुटुंब ही गेल्या पिढीतील संकल्पना होती. ‘एकच मुल कुटुंब’ ही आजची परंपरा आहे.
बिनभावंडांचे कौटुंबिक वातावरण :-
बिनभावंडांचे कौटुंबिक वातावरण हा या प्रश्नाचा गाभा आहे. चीनमध्ये ‘एकच मुल धोरण आहे’ काही पालक निर्णय घेऊन एकावर थांबतात. दुस-या बाळाचा जन्म होईपर्यंत पहिले मुल एकटेच असते. ब-याच वर्षांनी झालेले दुसरे मुल सुद्धा ‘एकुलत्या’ वातावरणातच वाढते. कुणाला दुसरं मुल होतच नाही. कुणाचे मुल आजार, अपघात अशा कारणांनी जाते. कुणाला कौटुंबिक, वैवाहिक समस्या असतात. कुणाला नोकरीधंदा असल्याने दुसरे मुल नको असते. कारणं काहीही असो, एकच मुल असल्याचे फायदे, तोटे यांचा विचार करून “आपल्याला योग्य” असा निर्णय घ्यावा लागतो.
एकाच मुलाचे फायदे :-
तुमचं प्रेम, लक्ष, वेळ, शक्ती, पैसे एकाच मुलावर केंद्रित करता येतात. शिक्षणाच्या विकासाच्या जास्त संधी एकाच मुलाला देता येतात. एकुलती एक मुलं शिक्षणात जास्त यशस्वी होतात. स्वावलंबी होतात. इतरांशी सहज मैत्री करतात. त्यांना दर्जेदार राहणीमान, आरोग्यसेवा, पुरवता येतात. कुटुंब लहान राहिल्याने दरडोई उत्पन्न वाढते. कुटुंबाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावतो. पर्यायच नसल्याने लहान कुटुंबाचे आपापसातले नातेसंबंधही घट्ट होतात.
एकाच मुलाचे तोटे :-
राजपुत्राची बडदास्त एकुलती एक मुलं राजपुत्राचं आयुष्य जगतात. हट्टी, लाडावलेली, स्वार्थी, बिघडलेली, एकलकोंडी अशी अनेक “विशेषणं” त्यांना लावली जातात. ये सब सरासर झूट है ! या सर्व दंतकथा आहेत. ती एकटी पडतात हे मात्र खरं आहे.
एकास दोन दोनास चार समस्या :-
एकुलत्या एक मुलावर मोठेपणी, दोन आईवडिल, आणि चार आजीआजोबा, अशा सहा वृद्धांची जबाबदारी येते. आजकाल आयुष्यमान वाढल्याने अनेक घरात हा प्रश्न निर्माण होतो. प्रश्न फक्त आर्थिक नाही. वृद्धांना भावनिक व दैनंदिन जीवनासाठीही आधार लागतो. तो मिळाला नाही तर ते शब्दशः अनाथ होतात. धनदौलत, मुलं बाळं, सगळे काही आल वेल असून देखील, एकटे पडतात.
एकुलती लेक :-
लग्न झाल्यावर, आईवडिल वाऱ्यावर? कसं शक्य आहे. लवचिकता हवी. सगळ्यांनाच. स्थळ काळ वेळ पाहून कुणाला तरी ताठरता सोडावी लागेल. सोय बघावी हेच बरे. लग्नानंतर तिला स्वतःचे आईवडील, सासूसासरे, नवरा आणि मुलं अशा तीन पिढयांचा आधारस्तंभ व्हावं लागतं.
भरपूर कमावत्या एकुलत्या लेकीला लग्न करणं जड जातं. नैराश्य येऊ शकतं.
एकच मुल समंजसपणे वाढवणे.
एकावर थांबण्याचा निर्णय त्याच्याच भल्यासाठी होता. तुम्ही त्याच्यावर अन्याय केलेला नाही. अपराधीपणाची भावना नको. त्याला वेळ द्या त्याच्याशी बोला. महागड्या खेळण्यांची, वस्तूंची फारशी आवश्यकता नसते. गृहिणी असाल तर ‘त्याच्याशिवाय’ इतरही कशात तरी रस घ्या. नाहीतर त्याचं आयुष्य, त्याच्यासाठी, तुम्हीच जगण्याची चूक कराल. त्याला मोकळीक द्या. वाव द्या. तुम्ही काम करणारी आई असाल, तर तुम्हांला मिळेल तेवढ्या वेळेत त्याचं जेवण, अभ्यास, छंद, शिस्त सगळं कोंबायचा प्रयत्न करू नका. कळीच्या पाकळ्या ओढून तिला फुलवता येत नाही.
दुहेरी उत्पन्न, विभक्त कुटुंबातील एकुलत्या एक मुलाला हवी असते ती साथ संगत. तुम्ही दिली नाही तर तो कुणाची तरी शोधणार. (ती चुकीच्या संगतीत गेली तर?) एकलकोंडा होतो. बोलायला कुणी उपलब्धच नसेल, तर मन बिघडते.
आईलाच गरजेप्रमाणे रोल बदलून, त्याची बहीण, भाऊ, मित्र व्हावं लागतं. वेगवेगळ्या कला, खेळ, छंद, पुस्तकांमधे त्याला गुंतवा. टी.व्ही. इंटरनेटवर बंधन घाला. नाहीतर त्याचं मन भावनाशून्य यांत्रिक बनेल.
त्याच्या स्वतःचा व तुमचा मित्रपरिवार आवर्जून वाढवा. लग्न, मुंज, समारंभ, क्लब, मंडळामध्ये रस घ्या. त्यासाठी पैसा व वेळ खर्च करा. त्याला बरोबर न्या. त्याचे आजी आजोबा बरोबर राहत नसतील तर ‘जवळपासचे’ शोधा. नक्की सापडतात. तेही प्रेमाला पारखे असतात. जवळपास राहणारी मानलेली बहीण किंवा भाऊ ही अतिशय चांगली संकल्पना आहे. निवड करून कौटुंबिक संबंध वाढवा. पुढाकार घ्या. त्यांना तुमचा संबंध वाढवण्याचा उद्देश स्पष्ट शब्दात सांगा. राखी, भाऊबीज, वाढदिवस, तिळगुळ, कार्यक्रमांमध्ये त्यांचे मानलेले नाते घट्ट करायची संधी द्या. समाजात मिसळणे हा एकटेपणावरचा तोडगा आहे. दुसरे मुल दत्तक घेणे हा सुध्दा एक उत्तम पर्याय आहे. काळ हिरे सोडून बाकी सगळ्या गोष्टी बदलतो.(फक्त हिरा ‘सदा के लिये’ असतो). कुटुंबातल्या काही गोष्टी पडद्याआड जातात. काही नव्या येतात. कुटुंबाची रचनाच बदलती असते. बदलानां सामोरे जाण्याचे शिक्षण त्याला द्या.
एक तर मुलाने आई वडील रहात असतील तिथे नोकरी व्यवसाय करावा. नाही तर आईवडीलांनी मुलाकडे जावे. इतके सामंजस्य नसेल, तर विभक्त कौटुंबिक जीवन अटळ आहे. आजच्या परिस्थितीत, शेजारचा फ्लॅट घेऊन स्वतंत्र राहणे, हाही एक उत्तम मार्ग आहे. गरज पडेल तेव्हा सोबत. नसेल तेंव्हा स्वतंत्र !
तुमचा एकुलता एक कुलदीपककाही चुकीचं वागला तर नाराज होऊ नका. प्रत्येक मुल कधी ना कधी चुकीचं वागतं. आशावादी रहा. शेवटी हे सगळं प्रकरणच समंजसपणाचं आहे.
तुम्ही एक मूल बिघडवू शकता. किंवा डझनभर मुलं बिघडवू शकता. त्याचा ‘एकुलता एक’ असण्याशी काहीही संबंध नाही! निर्णय वैयक्तिक आहे.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


