बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई

Mom taking care about sick child

बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई

बाळ आजारी पडले तर घरातील पहिली डॉक्टर आईच की! बाळाला ताप-सर्दी-खोकला झाला की पहिला प्रश्न येतो, आता काय करायचं? काळजी करण्यासारखं आहे की नाही, हे ठरवायचं कुणी. अर्थातच, आईनी.

आईला जर वाटलं — “थोडं काळजी सारखं वाटतंय”, तर तिनं कुटुंबाला सांगायचं, आणि कुटुंबानं डॉक्टरकडे न्यायचं. हीच आपली कौटुंबिक मॅनेजमेंट साखळी. म्हणूनच, बाळाची पहिली जबाबदारी आईवरच असते. आणि त्यामुळे बाळाची आईला “माहितगार” होणे आवश्यक आहे. त्यासाठी महिन्यातून एकदा माहितगार बालरोगतज्ञाच्या संपर्कात, येणे आवश्यक आहे.

सर्दी-खोकला (कॉमन कोल्ड)

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हजार एक वेळा सर्दी-खोकला होतो. तो व्हायरसमुळे होतो. दरवेळी नवीन व्हायरस, म्हणजे नवी सर्दी. शरीर त्या व्हायरसशी लढतं, आणि त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करतं.

नवजात बाळाला सगळेच व्हायरस नवीन असतात. म्हणून पहिल्या वर्षी 10–12 वेळा सर्दी-खोकला होणं अगदी नॉर्मल आहे. मोठ्या मुलांना वर्षातून ५–६ वेळा, तरुणांना ३–४ वेळा, आणि वय वाढत जाईल तसं हे प्रमाण कमी होतं.

सर्दी कशी होते आणि पसरते.

सर्दी खोकला श्वासाने आणि स्पर्शाने पसरतो. कुटुंबात, शाळेत, प्रवासात, गर्दीत. म्हणूनच “मास्क वापरा, साथ टाळा.” कोरोना काळात आपण सगळ्यांनी मास्क वापरून आपले जीव वाचवले. अनेक आप्त स्वकीय जवळचे प्रेमाचे लोक देवा घरी गेले. पण अजूनही समाजाचे डोळे उघडले नाहीत. आजही सर्दी झाली तर कुणीही मास्क लावत नाही. अगदी डॉक्टर सुद्धा. मास्क लावण्याची प्रथाच, प्रचलित झाली नाही. खरे तर, बिनमास्कचे घर नको, बिनमास्कचा खिसा नको. हे आपले ब्रीदवाक्य व्हायला पाहिजे. सर्दी झाली की त्याला पहिला प्रतिसाद म्हणजे “मास्क वापरा” हा असायला हवा. घरात डिस्पोजेबल मास्कचा साठा हवा. डॉक्टर, शिक्षक, पालक — सगळ्यांनी ही मास्क संस्कृती रुजवायला हवी. ते त्यांचे सामाजिक कर्तव्य आहे.

फळे, दही, थंड, खाल्ल्याने सर्दी होते हे खरे नाही. खोटे आहे. हा गैरसमज आहे! तो शेजारणीचा सल्ला आहे. किती पिढ्या आपण तो ऐकणार आहोत? कधीतरी डॉक्टरचे ऐका. विज्ञानाचे ऐका. सर्दी खाण्या-पिण्याने होत नाही. फळं, दूध, दही बंद करण्याची गरज नाही. उलट अन्नपाणी तोडल्याने बाळाचं नुकसानच होतं. बाळ उशिरा बरं होतं.

सर्दीची लागण झाल्यावर शरीरात काय घडतं?

व्हायरस शरीरात शिरतात आणि वेगाने वाढतात. दर 20 मिनिटांनी त्यांची संख्या दुप्पट होते! म्हणजे एका दिवसात कोट्यवधी व्हायरस शरीरात वाढतात. मग साधं संक्रमण “आक्रमणात” बदलतं. ही खरी लढाई आहे. आक्रमक व्हायरस विरुद्ध आपल्या प्रतिकारशक्तीची सेना. युद्धभूमी बाळाचे शरीर.

काळजी सारखी सर्दी आहे की नाही, कसे ओळखावे.

बाळ ताप-सर्दी-खोकल्यातही खेळतंय, खातंय, टवटवीत दिसतंय? तर विशेष काळजी नाही. पण बाळ गळून गेले आहे, निस्तेज आहे, बॅटरी डाउन झाली आहे, खात नाही, लघवी कमी होते, दम लागतोय, श्वास फास्ट आहे, बरगड्या आत खेचतायत. हा धोक्याचा इशारा आहे.

बाळ झोपलं असताना एका मिनिटात 40 पेक्षा जास्त श्वास घेत असेल — डॉक्टरकडे जा. 60 पेक्षा जास्त — आजच दाखवा. 80 पेक्षा जास्त — आत्ताच हॉस्पिटलमध्ये न्या. श्वास घेताना नाकपुड्या हलत असतील, नखे किंवा ओठ निळसर दिसत असतील — जीवाचा धोका आहे. तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

आजारी बाळाचे अन्न तोडणे पाप आहे.

नेहमीचा आहार, खाणं-पिणं चालू ठेवा. द्रव पदार्थ भरपूर द्या. पाणी पाजा. आईचं दूध ओढता येत नसेल तर पिळून चमच्याने पाजा. थोडं थोडं, जास्त वेळा खाऊ घाला.

श्वास मार्गाचे आजार आणि घरगुती उपचार

घसा धरला तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. कान ओला असेल तर कोरडा करा — औषधापेक्षा उपयोगी. मध, तुळस, आलं, लिंबू – हे घरगुती उपचार सुरक्षित असतात.

औषध म्हणजे दुधारी शस्त्र

सर्दी-खोकला बहुतेक वेळा आपोआप बरा होतो. निसर्गच त्याला बरे करतो औषधे क्वचितच लागतात. गरज नसताना दिलेल्या चुकीच्या धोकादायक औषधापेक्षा औषध न दिलेले जास्त चांगले. अँटीबायोटिकने व्हायरल सर्दी बरी होत नाही. पण आपल्या नेहमीच्या विश्वासाच्या डॉक्टरांनी दिल्यास त्यांच्या सल्ल्याने पूर्ण कोर्स घ्यावा.

सर्दी होऊ नये म्हणून.

सहा महिने फक्त आईचं दूध. पौष्टिक चौरस आहार
✅सरकारी + खाजगी, सर्व लसी वेळेवर
✅अ जीवनसत्वाचे डोस
✅मास्क आणि स्वच्छतेची सवय.

    बाळाच्या ताप-सर्दी-खोकल्यात आई म्हणजे पहिली डॉक्टर, पहिली नर्स, पहिली काळजीवाहक. माहिती हीच शक्ती. आई माहितगार झाली की घर सुरक्षित होतं.

    “मास्क वापरा, साथ टाळा.” बाळाची काळजी घ्या — पण घाबरू नका. निसर्ग, प्रतिकारशक्ती आणि आत्मविश्वास असलेली आई हीच खरी औषधं.

      Leave a Comment

      Your email address will not be published. Required fields are marked *

      Scroll to Top