वेडा बहिरा तानाजी आणि शहाणी बहिरी सुनिता 

वेडा बहिरा तानाजी आणि शहाणी बहिरी सुनिता

तानाजी आणि सुनिता — दोघेही बारा वर्षांचे, ग्रामीण शेतकरी कुटुंबातील, आमच्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थी. पण दोघांत साम्य इतकंच. तानाजी सगळ्यांचा नावडता, तर सुनिता सगळ्यांची आवडती.

एके दिवशी शाळेत खेळताना भांडण झाले. झोंबाझोंबी झाली. तानाजीने सुनिताचा हात खूप जोरात पिरगळला. सुनिता रडू लागली; तिचा हात हलत नव्हता. बाईंनी तानाजीला दोन धपाटे दिले आणि दोघांच्याही आई-वडिलांना शाळेत बोलावले. नेहमीप्रमाणे वाद, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

तानाजीच्या वडिलांचा संयम सुटला. प्रकरण माझ्यापर्यंत आले. डॉक्टर म्हणून आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी लक्ष घातले. त्यांचे म्हणणे होते —
“बाईंनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं होतं. मुलांच्या भांडणात मध्ये पडून तानाजीला न्याय द्यायला हवा होता. सगळे त्याला बाजूला सारतात, त्याच्याशी वाईट वागतात. सुनिता सगळ्यांची लाडकी आहे. शिक्षक पक्षपात करतात. अशा शिक्षकांना शाळेतून काढून टाकायला पाहिजे.”

सुनिताचा हात फक्त मुरगळला होता; फ्रॅक्चर किंवा डिसलोकेशन नव्हतं. म्हणजे प्रश्न वैद्यकीय नव्हता — सामाजिक होता. मी दोघांच्याही केस हिस्टरी पाहायचं ठरवलं. पालकांना “लक्ष घालून प्रश्न सोडवीन” असं सांगून घरी पाठवलं.

तानाजी : “वेडा बहिरा” म्हणून वाढलेलं बालपण

तानाजी पूर्ण बहिरा आहे हे त्याच्या आई-वडिलांना तो चार वर्षांचा होईपर्यंत समजलंच नाही. तो हट्टी आहे, आळशी आहे, ढ आहे असंच ते समजत राहिले.

पहिल्या वर्षापर्यंत तो छान होता. दीड वर्षाचा झाल्यावर चालायला-खेळायला लागला. घरात त्याची लहान बहीण लता आली. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं.

लता हसू लागली, आईला प्रतिसाद देऊ लागली. आई तिच्याशी बोलू लागली, खेळू लागली. तानाजी मात्र कोपऱ्यात एकटाच बसू लागला. आई आपल्याकडे दुर्लक्ष करते, असा त्याला राग येऊ लागला. एकदा त्याने दोन वर्षांच्या लताचा हात जोराने पिरगळला. लता रडू लागली; तानाजी मात्र हसू लागला.

आई घाबरली. तिने त्याला “वेडा” समजायला सुरुवात केली. आई-वडिलांचे धपाटे सुरू झाले.

एकदा पाणवठ्यावर शेजाऱ्यांनी विचारलं, “तुझा तानाजी बहिरा आहे का? अजून बोलत नाही.” आईने रागाने नकार दिला. दूर उभ्या तानाजीला तिने हातवारे करून बोलावलं. तो तिच्याकडे आला. आईला वाटलं — तो ऐकतो. पण प्रत्यक्षात तो हातवाऱ्यांवर प्रतिक्रिया देत होता.

लता अंगणवाडीत जाऊ लागली. मित्र-मैत्रिणी, गाणी, खेळ, नाच — तिचं जग रंगत होतं. तानाजी मात्र एकटाच. हळूहळू तो चिडका, आक्रस्ताळा आणि भांडखोर झाला. कुणी त्याला खेळायला घ्यायला तयार नसे.

बाजारातील प्रसंग

एकदा आईसोबत बाजारात गेल्यावर त्याने नकळत दुकानातील आंबा उचलला आणि खायला लागला. दुकानदाराने “चोर” म्हणून मारायला सुरुवात केली. आईनेही भर बाजारात त्याला मारलं. तो जमिनीवर लोळू लागला, ओरडू लागला.

शेवटी आई नरमली. “आणखी एक आंबा घेते, पण घरी चल,” म्हणाली.
चुकीच्या वागणुकीला नकळत बक्षीस मिळालं.

संध्याकाळी वडिलांना कळल्यावर त्यांनी त्याला मारलं आणि ओरडले —
“चार शब्द बोलायला कधी शिकणार? मूर्ख आहेस, नालायक आहेस!”

तानाजीला शब्द समजत नव्हते; पण एक गोष्ट समजली — कोणीच मला आवडत नाही.

तो घराबाहेर पळून गेला. तासन्‌तास भटकत राहिला. हळूहळू घराबाहेर राहण्याची त्याला सवय लागली.


वळणबिंदू

शेवटी आई त्याला मूकबधिर शाळेत घेऊन आली. श्रवणचाचणीत तो बहिरा असल्याचं स्पष्ट झालं. पण स्वभाव आड येत होता. तो सगळ्यांशी भांडायचा.

त्याचे वडील म्हणाले — “शाळेतून काढून टाका. गोट्या खेळत बसेल दिवसभर.”

माझ्या लक्षात आलं — गोट्या खेळणं हीच त्याची क्षमता आहे.
मी शाळेत गोट्यांच्या स्पर्धा घेतल्या. तानाजी पहिला आला. मग पतंग, कबड्डी, खो-खो, मलखांब — सर्व खेळांत तो पुढे राहिला. जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्याला बक्षीस मिळालं.

बक्षीस घेताना त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्यात “धन्यवाद” होता.

त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला. कुटुंबाला ओळख मिळाली. तानाजीचा आत्मविश्वास वाढला.
आता तो “वेडा बहिरा तानाजी” राहिला नव्हता.


सुनिता : योग्य वेळी मिळालेली साथ

सुनिता दहा महिन्यांची असताना तिचा सात वर्षांचा भाऊ लक्ष्मणाने लक्षात आणलं की ती आवाजाला प्रतिसाद देत नाही. घरच्यांनी तपासणी केली. पुनर्वसन केंद्रात श्रवणचाचणी झाली — ती बहिरी असल्याचं निश्चित झालं.

केंद्रात पालकांना मार्गदर्शन मिळालं. घरात सांकेतिक भाषा वापरायला सुरुवात झाली. खुणांसोबत शब्दही बोलले जाऊ लागले. हळूहळू तिला ओठांच्या हालचालींवरून शब्द ओळखता येऊ लागले.

पाचव्या वर्षी ती काही शब्द ओठवाचनाने आणि शेकडो शब्द सांकेतिक भाषेत समजू लागली.

ती आनंदी, सक्रिय, हुशार होती. मी तिची बुद्धिमत्ता चाचणी घेतली — आय.क्यू. १२१. सामाजिक कौशल्येही उत्तम.

आम्ही बहुसंवेदी (multi-sensory) शिक्षणपद्धती वापरली — दृष्टी, स्पर्श, वास, चव यांच्या माध्यमातून जगाची माहिती दिली.

आज ती शाळेतील सर्वांत हुशार विद्यार्थिनी आहे — अभ्यास, वाचन, हस्ताक्षर, चित्रकला, नृत्य, खेळ सगळ्यात पुढे. योग्य संधी मिळाली तर ती डॉक्टर किंवा नर्स होऊ शकते.

पालकांसाठी काही सूचना

  1. लवकर निदान आणि लवकर उपचार — सर्वाधिक फायदा देतात.
  2. इतर मुलांइतकेच प्रेम, जबाबदाऱ्या आणि हक्क द्या; जास्तही नाही, कमीही नाही.
  3. शक्यतो शाळेत घाला; प्रशिक्षित शिक्षक मदत करतात.
  4. मुलाला घरच्यांचे प्रेम आहे, हे त्याला जाणवू द्या.
  5. योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण मिळाल्यास मूकबधिर मुले अनेक क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतात.
  6. सामाजिक कौशल्ये विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.
  7. मोठे झाल्यावर त्यांना लहान मुलांसारखे वागवू नका.
  8. विवाहाबाबत निर्णय विचारपूर्वक घ्यावा; दोन मूकबधिर व्यक्तींना एकमेकांची समज चांगली होते. त्यांना ऐकू येणारी मुले होऊ शकतात.
  9. कर्णबधिर असणं कठीण आहे, पण त्यांच्याशी संपर्क साधणं आणि त्यांना संपर्क साधायला शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
  10. कर्णबधिरता ही सामाजिक समस्या आहे, वैदयकीय नाही.

ही कथा आपल्याला एक साधा पण महत्त्वाचा धडा देते —
अपंगत्वापेक्षा मोठी समस्या म्हणजे गैरसमज, दुर्लक्ष आणि चुकीची वागणूक.
आणि योग्य वेळी मिळालेली समजूत, प्रेम आणि संधी एखाद्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top