गृहपाठात पालकांनी लक्ष घातले तर मुलांना शिक्षणात निश्चितपणे यश मिळते. गृहपाठ किती महत्वाचा आहे हे त्यामुळे मुलांना कळते. गृहपाठात मदत करण्याचे अनेक फायदे असतात. शिवाय पालकांनाही एखादी नविन गोष्ट शिकायला मिळते.
मदत कशी करायची.
- शिक्षकांशी वैयक्तिक ओळख करुन घ्या. आपुलकीचे संबंध निर्माण करा. शाळेतल्या कार्यक्रमांना उपस्थित रहा. आमंत्रण पत्रिकेला मान दया. शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. पालक शिक्षक सभांमध्ये आवर्जुन जा. वेळ काढा. शिक्षकांना भेटा. पालकांकडून गृहपाठाविषयी काय अपेक्षा आहेत हे समजावून घ्या.
- रोजचा गृहपाठ करण्याची घरातली जागा ठरवून घ्या. त्याच जागी रोज बसा. बैठक योग्य हवी. उजेड पुरेसा हवा. कागद वहया पेन पेन्सिली, खोडरबर, शार्पनर, कात्री-डिंक अशा वस्तू सहज हाताशी येतील अशा पेटीत ठेवा.
- गृहपाठाची वेळ ठरवून घ्या. त्याचवेळी तितकाच वेळ नियमितपणे गृहपाठ करायला लावा. काही मुलांना दुपारच्या खाण्या-खेळण्यानंतर गृहपाठ करायला आवडतो. काहींना रात्री जेवल्यानंतर आवडतो. तुमची सोय आणि मुलाची आवड पाहून वेळ ठरवा. व ती पाळा.
- गृहपाठ करताना व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. टी.व्ही., टेपरेकॉर्डर, रेडिओ, फोन, कौटुंबिक-व्यायसायिक कामे नकोत. गृहपाठ एके गृहपाठ हवा. घरात धावपळ, आरडाओरडा, धामधूम नको. गृहपाठ हे घरातले सर्वात मोठे काम माना.
- गृहपाठ मुलाने स्वतः करायचा आहे. आई वडिलांनी नाही. त्याला स्वतः विचार करायला लावा म्हणजे तो शिकेल. शाळेची शिस्त पाहून गृहपाठाच्या पाटया टाकू नये. मुलांनी शिकावे म्हणून गृहपाठ हवा. चुका होउ द्या. चुक झाल्यावर ती दुरुस्त करायला शिकवा. चुक झाली म्हणून रागवू नका. कुठे आणि का चुकलं हे समजावून घ्या. सुचना करा. मार्गदर्शन करा. शिकणे हे त्याचेच काम आहे !
- मुलाच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सहभागी व्हा. वेळापत्रक, परीक्षा, लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक,
सेमिस्टर, टर्म, विषय, इंटर्नल मार्क, वर्क बुक, त्याचे मार्क या बाबीमध्ये लक्ष घाला. ‘त्याचं
- तो करतो मला काही बघावे लागत नाही.’ अस म्हणू नका. ते जबाबदारी टाळणे आहे. तसंच ‘तो स्वतःहून काहीच करत नाही. मलाचं सगळं कराव लागत असही म्हणू नका. ते चूक आहे. करायच त्यांनीच आहे. पण तुमचा सहभाग अपेक्षित आहे. पूर्ण केलेला गृहपाठ तपासून पहा. त्याला काही काळजी वाटत असेल, समजत नसेल, प्रश्न असतील तर तुम्ही मदतीला उपलब्ध आहात हे दाखवून द्या.
- त्याच्या कामाचे प्रयत्नांचे कौतुक करा. त्यांनी काढलेली चित्रे, आकृत्या, पोस्टर फ्रिजवर चिकटवून ठेवा. त्याच्या शैक्षणिक यशाची माहिती जवळच्या नातेवाईकांना त्याच्यासमोर सांगा.
- मुलासमोर चागंला आदर्श ठेवा. वर्तमानपत्र, पुस्तक तुम्ही वाचताना, पत्रव्यवहार करताना
त्याला दिसलं पाहिजे. लेखन वाचनाची संस्कृती घरात ठेवा. पालकांच्या सल्ल्याप्रमाणे
वागण्यापेक्षा पालकांचे अनुकरण करण्याची शक्यता जास्त. - गृहपाठ करण्यात करुन घेण्यात काही अडचणी येत असतील तर त्याच्या शिक्षकांना भेटून चर्चा करा. काही मुलांना फळयावरचं दिसत नसतं. काहींना ऐकायला कमी येत असतं. एकाग्रता कमी असते. शिकण्याचा वेग कमी असतो. काहींना लेखन-वाचनात अडचणी असतात. कारण शोधून काढून मार्ग काढावा लागतो.
गृहपाठाचा हा ‘फंडा’ लक्षात घेतला तर ‘अतिच गृहपाठ देतात ‘म्हणून शाळेला दोष देण्याची पाळी येणार नाही आणि गृहपाठ म्हणजे एक ‘शिक्षा किंवा कटकट’ न वाटता शिक्षणाचे एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघता येईल.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


