पैठणचे संत एकनाथ महाराज – 10
भारतीय इतिहासाच्या गोष्टी

महाराष्ट्राची संतपरंपरा खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, त्यानंतर सोळाव्या शतकातील तेजस्वी संत. एकनाथ महाराज. आणि मग आले तुकाराम महाराज.
त्या काळात लोकांच्या मनात जातपात, भेदभाव आणि अन्याय खोलवर रुतलेले होते. पैठणचे संत एकनाथ महाराज विठोबाचे मोठे भक्त होते. त्यांची शिकवण होती – सगळ्यांना आपले मानावे.
एकदा काय झाले?
गोदावरी नदीच्या घाटावर संत एकनाथ स्नानाला गेले होते. वाटेत एक खोडकर माणूस उभा राहिला. त्याने घरातले घाण पाणी एकनाथांच्या अंगावर फेकले.
संत काही न रागवता पुन्हा स्नानाला गेले. तो पुन्हा पुन्हा तसेच करीत राहिला. अनेक वेळा हे घडले. शेवटी संत एकनाथ हसून म्हणाले –
“बरे झाले! माझ्या मुळे तुझ्या घरातले सगळे घाण पाणी संपले. बघ, माझा तुला उपयोगच झाला.”
हे ऐकताच तो दुष्ट खजील झाला. येऊन एकनाथांच्या पायांशी पडला. संतांच्या क्षमाभावाने आणि सहनशीलतेने त्याचे मन उजळले.
संत एकनाथ म्हणतात –
“एका जनार्दनी नाम घेऊनी । सुखेचि सुखे भोगावे ॥”
ते पुढे एकनाथी भागवत लिहितात. लोक म्हणतात –
“एकनाथी भागवत वाचलं की, मन शांत होतं, आनंदी होतं, आणि भांडणं कमी होतात.”
आपण गातो ती दत्ताची आरती
“त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा” ही सुद्धा संत एकनाथांनीच लिहिली आहे.
श्री संत एकनाथ महाराज की जय!
जय महाराष्ट्र!
भारत माता की जय!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

