प्रगती पुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना

Failed in exam

या प्रगतीपुस्तकात आलेल्या लाल रेघांनी घरोघरी धुमाकूळ घातला आहे. अनेक पालकांना आपले आयुष्य उध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. सर्व भौतिक सुखे पायांशी लोळण घेत असताना शैक्षणिक अपयश का यावे हेच त्यांना समजत नाही. कुणाचं काय चुकलं याचा शोध कुटुंबात चालू आहे. आई, वडील, शिक्षक, शाळा, शिकवणी हे सर्वजण लाल रेघांचे पितृत्व एकमेकांवर ढकलून विश्वामित्री पवित्रा घेत आहेत.

मुलं तर बिचारी आई-वडिलांची प्रक्षोभक किंवा हताश प्रतिक्रिया पाहून अवाक झाली आहेत. सैरभैर झाली आहेत. परिस्थिती या चिमुरड्याच्या आटोक्याबाहेर आहे. त्यांच्या आजूबाजूची माणसं कशी वागतील यावर मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची घडी बसणे किंवा विस्कटणे अवलंबून आहे.

अशा कुटुंबांना मदतीचा हात हवा आहे. मार्गदर्शन हवे आहे. पालक लाल रेघा आल्यावर धावपळ चालू करतात. शिक्षक, मुख्याध्यापक, शिकवणीचे सर यांना भेटतात “अधिक कष्ट घ्या, अधिक लक्ष द्या, काळजी करू नका, पुढे जाऊन त्याला आपोआप समज येईल.” असे सल्ले मिळतात. घरातले वडीलधारे नातेवाईक मुलांसाठी जास्त वेळ देण्याचा सल्ला देतात. शाळा बदल, माध्यम बदल, राहण्याची जागा बदल, होस्टेलवर पाठव, जास्तीच्या शिकवण्या लाव अशा टोकाच्या उपाययोजना केल्या जातात.

हा प्रश्न असा आज या घडीला निर्णय घेऊन एक्शन घेणारा नसतो. शैक्षणिक पीछेहाट एकाच वेळी विविध कारणांनी होत असते. त्यांचे निदान करून निवारण करण्यासाठी पावले उचलावी लागतात. बालमार्गदर्शन केंद्र (Child Guidance Clinic) ही अशावेळी सल्ल्यासाठी जाण्याची जागा आहे.

बालमार्गदर्शन केंद्रात बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ, श्रवणतज्ञ, वाचनतज्ञ, बालमानसतज्ञ, सोशल वर्कर, फिजिओथेरपिस्ट, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ असतात. ते सगळे मिळून शैक्षणिक पीछेहाटीची कारणं शोधून काढतात, मार्गदर्शन करतात. एकंदरीत Child Guidance Clinic म्हणजे प्रगतीपुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना आहे, असे समजायला हरकत नाही.

लाल रेघांची काही कारणे :
१. डोळ्यांना नंबर
२. ऐकायला कमी येणे
३. वाचनदोष
४. लेखनदोष
५. स्पेलिंग घोटाळा
६. वाचादोष
७. कमी एकाग्रता
८. अस्थिरता
९. कमी बुद्धिमत्ता
१०. कौटुंबिक ताणतणाव
११. वर्तणूक समस्या
१२. शाळेतील समस्या
१३. भावनांशी वैर
१४. जुनाट शारीरिक आजार
१५. शैक्षणिक अपरिपक्वता
१६. अति कडक किंवा अति बेफिकीर पालक
१७. पालकांच्या अवाजवी अपेक्षा

अशी अनेक कारणं असतात. अनेकदा एकाच वेळी अनेक कारणं काम करत असतात. त्यांच्याकडे कानाडोळा केल्यास लाल रेघा येतात.

सुशिक्षित पालकांना आपल्याला सगळं समजतं असा गैरसमज असतो. आपल्याला मदतीची गरज आहे हे त्यांना माहीत नसतं. विशेषतः नापास होण्याचं कारण मानसशास्त्रीय असलं तर ते पालकांना पटायला कठीण जातं. मानसिक व भावनिक समस्या म्हणजे फक्त मनोरुग्ण असं नाही. नॉर्मल मुलांनाही मानसिक व भावनिक कारणांनी शैक्षणिक अडचणी येऊ शकतात. “काही नाही, तो फक्त आळशी आहे” — हे वाक्य स्वतःची फसवणूक करून घेण्यासाठी म्हटलं जातं. खरं तर मुलगा अजिबात आळशी नसतो हे म्हणणाऱ्यालाही ठाऊक असतं.

बुद्ध्यांक मापन करणे महत्त्वाचे असते. चांगली बुद्धी असूनही नापास होण्याची कारणं असतात. आणि बुद्धी कमी असूनही कष्टाळू मुले चांगले मार्क मिळवू शकतात. चष्म्याचा नंबर काढणे, श्रवणशक्तीद्वारे अनेक मुलांच्या लाल रेघा निघालेल्या आम्ही पाहिल्या आहेत. मानसिक व भावनिक चाचण्या देखील महत्त्वाच्या आहेत. मानसशास्त्रज्ञांशी चर्चा म्हणजे मनोरुग्ण असणे असे नाही. तज्ञांच्या हातून केलेल्या अशा चाचण्यांचे निष्कर्ष सहसा योग्यच असतात. अशा प्रसंगी पालकांना पटले नाही तरी पालकांनी सहकार्य करायला हवं. सल्लागाराचे कर्तव्य योग्य सल्ला देण्याचे आहे, पटेल असाच सल्ला देण्याचे नाही.

उदाहरणार्थ : मुलगा सातवीत गेला, लाल रेघा आल्या म्हणून बालमार्गदर्शन केंद्रात आणला. शैक्षणिक क्षमता चाचणीत लेखन, वाचन, गणित या तीन क्षेत्रात चौथीची क्षमता सिद्ध झाली. आता त्याला शाळेत सातवीचे शिक्षण, सगळीकडे शेकड्यात मुले — कशी होणार प्रगती? नुसतं “त्याचा पाया कच्चा राहिला” हे वाक्य म्हणून प्रश्न सुटणार नाही. हा पाया पक्का करण्यासाठी काही प्रयत्न हवेत.

बालमार्गदर्शन केंद्रातील शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ वैयक्तिक क्षमताधिष्ठित शैक्षणिक आराखडा (Individualized Education Therapy Plan) आखतात आणि त्याची अंमलबजावणी करणारी विशेष शिकवणी/शैक्षणिक उपचार (Educational Therapy) देतात. एकेक क्षमता वाढवतात. ती आली की पुढच्या पायरीवर जातात. काही केंद्रांमध्ये ही सोय नसते, पण नसली तर ती निर्माण करायला हवी. आपलं काम समाजाच्या उपयोगी पडण्याचं आहे. सल्ला देऊन मोकळं होण्याचं नाही.

पालकांनी लाल रेघांच्या दवाखान्यात जावं. शिक्षकांनी पालकांना पाठवावं. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना बालमार्गदर्शन केंद्राचं कार्य व उपयोग याविषयी माहिती द्यावी. एकूणच समाजाचा शैक्षणिक पीछेहाट बघायचा दृष्टिकोन परिपक्व व शास्त्रोक्त व्हावा ही या लेखामागील अपेक्षा आहे. आपल्या जवळचं बालमार्गदर्शन केंद्र कोठे आहे हे जवळच्या बालरोगतज्ञांना विचारा. जवळपास नसल्यास ते निर्माण करायला पुढाकार घेण्याची विनंती बालरोगतज्ञांना करा.

पक्का पाया शिकवणी

बालकल्याण केंद्रामार्फत प्रगतीपुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना चालवला जातो. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने शैक्षणिक पीछेहाटीची कारणं शोधली जातात. विशेषतः गतिमंद आणि शैक्षणिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी विशेष वैयक्तिक शिक्षणाची गरज असते.

प्रचलित शिक्षण व्यवस्थेत अशाप्रकारे उपचारात्मक शिक्षण देण्याची व्यवस्था नाही. आठवीतल्या मुलाला चौथीचं लिहता-वाचता येत नसेल तरी आठवीचीच शिकवणी लावली जाते. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या व एकूण परिस्थिती पाहता शाळांकडून फार अपेक्षा ठेवता येत नाही.

समाजाने व पालकांनी या अडचणीतून मार्ग काढायला हवा. बालकल्याण केंद्राने आपल्या “पक्का पाया शिकवणी” प्रकल्पामार्फत हे काम हाती घेतले आहे.

विशेष शिक्षकांमार्फत खाजगी शिकवणीच्या स्वरूपात हा प्रकल्प राबवला जातो. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट वैयक्तिक शैक्षणिक आराखडा आखतात व दर तीन महिन्यांनी प्रगतीचा आढावा घेतात. विशेष शिक्षक क्षमताधिष्ठित शिक्षणाच्या तत्त्वावर शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top