चांगल्या बाल आहाराचे सहा नियम

A child in a red bow tie enjoys a healthy meal with vegetables indoors.

(Six Rules of Good Infant Nutrition)

बालकाचा पहिला आहार हा त्याच्या आयुष्यभराच्या आरोग्याची पायाभरणी करतो. योग्य वेळी योग्य आहार मिळाला तर बाळाची वाढ, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते.

बालरोगतज्ज्ञ म्हणून माझ्या अनुभवातून सांगतो – चांगल्या बाल आहाराचे काही साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत.


१. पहिले सहा महिने – फक्त आईचे दूध

बाळाला जन्मानंतर पहिले सहा महिने फक्त आईचे दूध द्यावे.
या काळात पाणी, मध, गोड पाणी किंवा इतर कोणतेही अन्न देण्याची गरज नसते.

आईचे दूध हेच बाळासाठी संपूर्ण आणि सर्वोत्तम अन्न आहे.


२. सहाव्या महिन्यापासून खीर सुरू करा

सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला पूरक आहार (Complementary feeding) सुरू करावा.

खीर देताना काही गोष्टी लक्षात ठेवा:

  • बाळाला बसवून खाऊ घालावे, आडवे झोपवून नको.
  • खीर सेमिसोलिड (अर्धघन) असावी.
  • खूप पातळ नको.

खिरीत साधारणतः:

  • तांदूळ
  • डाळ
  • थोडे तूप

चमचा वाकडा केल्यानंतर खीर वाहून जाऊ नये इतकी घट्ट असावी.

पातळ अन्न – पातळ बाळ.
घट्ट अन्न – घट्ट बाळ.


३. खिरीत प्रथिने (Protein) घाला

बाळाच्या वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात.

खिरीत खालील पदार्थ मिसळू शकता:

  • शेंगदाणे
  • फुटाणे
  • उसळ
  • अंडी
  • मटण
  • मासे
  • चिकन

घरी जे काही प्रोटीनयुक्त अन्न शिजवलेले असेल ते वाटून किंवा कुस्करून खिरीत मिसळा.

आहारात मिश्रण आणि बदल असणे महत्त्वाचे आहे.


४. भाज्या आणि फळे घाला

खिरीत बदल करून भाज्या आणि फळे घालावीत.

यामुळे बाळाला:

  • जीवनसत्त्वे (Vitamins)
  • खनिजे (Minerals)
  • तंतुमय पदार्थ (Fiber)

मिळतात आणि आहार संतुलित होतो.


५. दिवसातून चार वेळा पूरक आहार

सहा महिन्यांनंतर बाळाला दिवसातून चार वेळा खीर द्यावी.

वेळा साधारणतः:

  • सकाळी – ८ वाजता
  • दुपारी – १२ वाजता
  • संध्याकाळी – ४ वाजता
  • रात्री – ८ वाजता

या व्यतिरिक्त इतर वेळी आईचे दूध द्यावे.


६. आजारी बाळाचे अन्न तोडू नका

बाळ आजारी असताना अनेकदा अन्न कमी केले जाते.
हे चुकीचे आहे.

आजारी बाळाला अन्न देत राहणे आवश्यक आहे.

अन्न बंद केल्यास:

  • वजन कमी होते
  • अशक्तपणा वाढतो
  • बरे होण्यास वेळ लागतो

सातूचे पीठ – एक पौष्टिक पारंपरिक आहार

(Sattu Flour – A Traditional Nutritious Food)

सातू म्हणजे विविध धान्ये आणि कडधान्यांचे पौष्टिक मिश्रण.

सातू बनवण्यासाठी सात घटक

१. जवस
२. गहू
३. तांदूळ
४. मका
५. हरभरा
६. मुग
७. मटकी

बनवण्याची पद्धत

  • सर्व धान्ये स्वच्छ धुवा
  • मोड आणा
  • उन्हात वाळवा
  • भाजून घ्या
  • दळून पीठ तयार करा

चव वाढवण्यासाठी:

  • साखर
  • मीठ
  • जिरे
  • वेलची

घालू शकता.

हे सातूचे पीठ ६ महिन्यांच्या बाळापासून १०० वर्षांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहार आहे.

जगातील सर्व आयांनी चांगल्या बाल आहाराचे हे नियम पाळले तर कुपोषण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

बाळाच्या आईने कोणते नियम मोडले आहेत हे समजून घेऊन त्या चुका सुधारण्यास डॉक्टरांनी मदत करावी.
म्हणजे बाळाचे वजन वाढू लागते आणि आरोग्य सुधारते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top