LMG 002 – महात्मा गांधींजीनी गूळ सोडला त्याची गोष्ट.
लहान मुलांना मोठे करणाऱ्या गोष्टी
समंजस, जबाबदार आणि कामाचा माणूस करणाऱ्या.
२. महात्मा गांधींजीनी गूळ सोडला त्याची गोष्ट.
महात्मा गांधी यांनी भारत स्वतंत्र केला. इंग्रजांना पळवून लावले. महात्मा गांधी इंग्लंडमध्ये वकिली शिकले. बॅरिस्टर झाले. त्या काळात ते सूट, बूट आणि टाय घालायचे. पण त्यांना आपला देश स्वतंत्र करायचा होता.
इंग्रजांना देशाबाहेर घालवायचं होतं. त्यांना देश बदलायचा होता. त्यासाठी गांधीजींनी आधी स्वतःला बदललं. महागडे कपडे सोडले. साधे कपडे घालायला सुरुवात केली. साधं राहिले. साधं जेवले. स्वतःच्या आयुष्यात बदल केला आणि मग देशाला बदलण्याचा प्रयत्न केला.
एकदा एक आई आपल्या मुलाला घेऊन गांधीजींकडे आली. ती म्हणाली, “गांधीजी, माझा मुलगा खूप गूळ खातो. तुम्ही त्याला सांगा ना, गूळ कमी खात जा.” गांधीजींनी मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले, “ठीक आहे. पंधरा दिवसांनी पुन्हा या.” आईला काही समजेना. एवढंसं सांगण्यासाठी पंधरा दिवस कशाला? पण ती काही बोलली नाही.
पंधरा दिवसांनी आई मुलाला घेऊन पुन्हा गांधीजींकडे आली. गांधीजींनी मुलाला जवळ बोलावलं. ते म्हणाले,”बाळा, फार गूळ आणि साखर खाऊ नकोस.
आरोग्यासाठी ते चांगलं नसतं.” आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, “गांधीजी, एवढंच सांगायचं होतं, तर मागच्या वेळीच का नाही सांगितलं?”
गांधीजी हसले. ते म्हणाले, “कारण त्या वेळी मी स्वतः गूळ खात होतो. माझी गूळ खाण्याची सवय सोडायला मला पंधरा दिवस लागले.
मी जे स्वतः करत होतो, ते करू नकोस असं या मुलाला कसं सांगणार?” आधी स्वतः केले. मग दुसऱ्याला सांगितले.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


