स्वातंत्र्य, आराम की कर्तृत्व?

Joyful boy celebrating a soccer win outdoors in Portugal.

LMG–007 —तीन कुत्र्यांची गोष्ट

आज मी तुम्हाला… तीन कुत्र्यांची गोष्ट सांगणार आहे. तीन कुत्रे. पण तिघांचं आयुष्य… एकदम वेगळं!

पहिला कुत्रा होता—रस्त्यावरचा. भटकणारा. त्याला नावच नव्हतं. त्याची काही खास ओळखही नव्हती. घर नाही. मालक नाही. कुणाचं बंधन नाही. स्वातंत्र्यच स्वातंत्र्य! सगळं जगच त्याच्या मालकीचं! लहर फिरेल तसं उंडारायचं. आपल्यासारख्या भटक्या मित्रांबरोबर फिरायचं. भूक लागली? खायला शोधायचं. मिळालं तर खायचं. नाही मिळालं? उपाशी राहायचं. कुठेही झोपायचं. कुठेही शी करायची. कुठेही तंगडी वर करायची! कोणी विचारणार नाही. कोणी अडवणार नाही. पूर्ण स्वातंत्र्य!

पण… सुरक्षितता नाही. नियम नाहीत. दिशा नाही. उद्याचं काय? माहीत नाही. काही भटके कुत्रे गाडीखाली सापडतात. काही दुसऱ्या कुत्र्यांशी भांडून जखमी होतात. काही आजारी पडतात. काही उपाशी राहतात.

म्हणजे काय? स्वातंत्र्य होतं… पण त्या स्वातंत्र्याला—दिशा नव्हती.

दुसरा कुत्रा होता—पाळीव कुत्रा. त्याला छानसं नाव होतं. छान घर होतं. घरचे त्याची खूप काळजी घ्यायचे. बसल्या जागी खायला. बसल्या जागी प्यायला. आंजारून… गोंजारून… लाड! फोटो! सुवासिक साबणाने आंघोळ! आरामच आराम!

त्याला काही करायची गरजच नव्हती. काम नाही. धाम नाही. धावपळ नाही. व्यायाम नाही. जबाबदारी नाही. खायचं… बसायचं… झोपायचं… आणि पुन्हा? खायचं!

हळूहळू तो झाला—गलेलठ्ठ! अगडबंब!

त्याच्याकडे सगळं होतं. पण त्याच्याकडून—काही करण्याची अपेक्षाच नव्हती.

म्हणजे… नुसता आरामही पुरेसा नाही.

आणि आता…

तिसरा कुत्रा!

तो होता—आर्मीचा कुत्रा!

त्याची निवड केली होती. तो हुशार होता. चपळ होता. कामसू होता. पण मला सांगा… तो जन्मल्याबरोबर बॉम्ब शोधायला लागला होता का?

नाऽऽऽही!

त्याला शिकवलं गेलं. त्याला प्रशिक्षण दिलं गेलं. त्याने पुन्हा पुन्हा सराव केला. धावला. व्यायाम केला. शिस्त शिकला. प्रशिक्षकाबरोबर काम करायला शिकला. इतर कुत्र्यांबरोबर काम करायला शिकला.

त्याने आपली क्षमता—वाढवली. आणि ती क्षमता—कामासाठी वापरली.

तो झाला… हुशार! चपळ! शिस्तबद्ध! शूर! धाडसी! Strong and Stout!

त्याने बॉम्ब शोधले. अमली पदार्थ शोधले. धोकादायक माणसांना शोधायला मदत केली. लोकांचे जीव वाचवायला मदत केली. आणि त्याच्या कामाचा—गौरव झाला!

आता मला सांगा… पहिल्या कुत्र्याकडे काय होतं? स्वातंत्र्य!

दुसऱ्याकडे काय होतं? आराम!

आणि तिसऱ्याकडे? प्रशिक्षण! शिस्त! काम! कर्तृत्व!

पण… याचा अर्थ स्वातंत्र्य वाईट आहे का?

नाही!

आराम वाईट आहे का?

नाही!

स्वातंत्र्यही हवं. आरामही हवा. पण आयुष्य घडवायला… शिकावं लागतं. सराव करावा लागतो. काम करावं लागतं. आणि आपल्या कामाची— जबाबदारी घ्यावी लागते.

आपण कुठे जन्माला यायचं… कोणत्या घरात जन्माला यायचं… आपल्याला कोणती परिस्थिती मिळणार… हे सगळं आपल्या हातात नसतं.

पण… मिळालेल्या संधीचं काय करायचं? काय शिकायचं? किती सराव करायचा? आपली क्षमता कशी वाढवायची? आणि आपण स्वतःला कसं घडवायचं?

यात मात्र—आपलाही वाटा असतो!

म्हणून मुलांनो… फक्त वाटेल तसं जगायचं? फक्त आरामात जगायचं?

की… शिकायचं… काम करायचं… जबाबदारी घ्यायची… आणि कर्तृत्ववान व्हायचं?

तुम्हीच ठरवा.

कारण—गोष्ट होती तीन कुत्र्यांची… पण… निर्णय आहे तुमच्या आयुष्याचा.

तुम्हीच ठरवा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top