आरव आणि निरव—दोघे जिवलग मित्र
एकत्र शाळेत जायचे. एकत्र अभ्यास करायचे. एकत्र डबा खायचे. एकत्र खेळायचे.
पण एक दिवस… पतंगावरून दोघांची हमरीतुमरी झाली!
संक्रांतीचा दिवस होता. दोघे गच्चीवर पतंग उडवत होते.
आरवचा पतंग— चमकदार निळा!
निरवचा— सोनेरी पिवळा!
दोन्ही पतंग आकाशात उंच उंच भरारी घेत होते. दोघेही खुशीत होते.
पण अचानक— जोराचा वारा आला. दोन्ही पतंग एकमेकांच्या जवळ आले. मांजे एकमेकांत अडकले.
आरवने आपला मांजा जोरात खेचला.
निरव ओरडला, “अरे! ओढू नकोस. माझा पतंग फाटतोय!”
आरवही चिडला. “मग तू माझ्या मध्ये कशाला आलास? तुझा पतंग बाजूला घे!”
“मी आलो?”
“हो! तूच!”
“तूच मध्ये आलास!”
“नाही! तू!”
एकाने मांजा खेचला.
दुसऱ्याने आणखी जोरात खेचला.
खेच… खेच… ओढाताण!
आणि— फट्!
एक पतंग फाटला.
मग दुसराही!
दोन्ही पतंगांचे तुकडे खाली पडले.
क्षणभर दोघेही स्तब्ध.
आणि मग…
पतंगांचा गुंता संपला.
पण— मित्रांचा गुंता सुरू झाला!
निरव संतापून आरवच्या अंगावर धावला.
“तू माझा नवीन पतंग फाडलास!”
आरवही काय ऐकून घेणार? त्याने निरवची गचांडी धरली.
“तुझ्यामुळे माझाही पतंग फाटला!”
आता पतंग गेले बाजूला.
कोणाची चूक? कोण बरोबर? कोण आधी मध्ये आला?
यावरून दोघांची हमरीतुमरी सुरू झाली.
आता तर मारामारी होणारच…
तेवढ्यात— आरवचे आजोबा आले.
ते बराच वेळ हे सगळं पाहत होते.
ते म्हणाले, “अरेच्या! इथे तर मोठ्ठा accident झालेला दिसतोय!”
दोघांनी फाटक्या पतंगांकडे पाहिलं.
आजोबा म्हणाले, “दोन पतंगांची टक्कर झाली. दोघांचाही चोळामोळा झाला.
पण मला वाटतं… पतंगांपेक्षा मोठा accident दुसरीकडेच झालाय!”
दोघे आजोबांकडे पाहू लागले.
“तुमच्या— मैत्रीचा!”
दोघे गप्प.
आजोबा म्हणाले, “पतंग गुंतले तेव्हा तुम्ही काय केलंत?”
“मांजा ओढला.”
“दोघांनी?”
“हो.”
“आणि जितका जास्त ओढला…”
दोघे म्हणाले— “तितका गुंता वाढला!”
“आणि शेवटी?”
“दोन्ही पतंग फाटले.”
आजोबा हसले.
“मग आता तुम्ही एकमेकांशी जितके भांडाल तितकं काय होईल?”
दोघे पुन्हा गप्प.
आजोबा म्हणाले, “पतंगाचा मांजा असो किंवा मैत्रीचा धागा— ओढाताण केली, तर तुटतो.”
मग आजोबांनी जमिनीवर पडलेल्या पतंगांकडे पाहिलं.
“आता मला एक सांगा. हे दोन फाटलेले पतंग… एकत्र जोडून… एक नवीन पतंग करता येईल?”
दोघांनी पतंगाचे तुकडे उचलले.
निळा तुकडा. पिवळा तुकडा.
कागद जोडला. चिकटवला.
दोघांनी मिळून एक नवीन— निळा-पिवळा रंगीबेरंगी पतंग तयार केला!
आता प्रश्न होता— तो उडवणार कोण?
आरवने निरवकडे पाहिलं.
निरवने आरवकडे.
आणि दोघे हसले.
“दोघं मिळून!”
पतंग पुन्हा आकाशात गेला.
यावेळी एकच पतंग होता.
पण तो उडवणारे— दोन मित्र होते.
आरव म्हणाला, “सॉरी निरव. मी जरा जास्तच चिडलो.”
निरव म्हणाला, “मीही सॉरी. मीही तुलाच दोष देत राहिलो.”
आणि पुन्हा दोघे पतंग उडवू लागले.
मुलांनो, भांडण कुणाचं होत नाही?
मित्रांचं होतं. भावंडांचं होतं. घरात होतं. शाळेत होतं.
भांडण होणं हीच मोठी समस्या नाही.
भांडण झाल्यावर आपण काय करतो— ही खरी गोष्ट आहे.
एकमेकांना दोष देत राहिलो… ओरडत राहिलो… ओढाताण करत राहिलो…
तर— नात्याचा धागाही तुटू शकतो.
पण थोडं थांबलो… एकमेकांचं ऐकलं… आपली चूक मान्य केली… आणि दोघांनी मिळून मार्ग शोधला…
तर— गुंताही सुटतो.
आणि मैत्रीही टिकते.
म्हणून लक्षात ठेवा—
पतंगाचा मांजा असो, किंवा मैत्रीचा धागा— ओढाताण केली तर तुटतो; समजून घेतलं तर गुंता सुटतो
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


