बुद्धिबळ — विचार करायला शिकवणारा खेळ
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट.
माझा दहा वर्षांचा नातू समिहन शाळेतून घरी येताना मला आनंदाने म्हणाला,
“आबा, आज मी बुद्धिबळाचे सातपैकी सहा डाव जिंकलो!”
सातवा डाव तो त्याच्या बुद्धिबळाच्या शिक्षकांकडून हरला होता.
त्याच्या चेहऱ्यावर सहा डाव जिंकल्याचा आनंद होता. पण शिक्षकांकडून हरल्याची निराशा नव्हती.
तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला —
बुद्धिबळ मुलाला नेमकं काय देतं?
आज समिहन चौदा वर्षांखालील गटात शाळा, आंतरशालेय, तालुका अशा स्पर्धांमधून पुढे जात जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे.
त्याच्याकडे पाहताना क डावात दिसते.
पटाकडे बघ.
परिस्थिती समजून घे.
मागच्या चाली आठव.
समोरच्याच्या मनात काय असेल याचा अंदाज घे.
आपल्याकडे कोणते पर्याय आहेत ते शोध.
प्रत्येक चालीचा पुढचा परिणाम काय होईल याचा विचार कर.
मग निर्णय घे.
आणि मगच चाल कर.
मागचा विचार → समोरची परिस्थिती → पुढचा विचार → मग कृती.
एका बुद्धिबळाच्या डावात ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडते.
त्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागते. पूर्वीचे अनुभव आठवावे लागतात. आकृतिबंध ओळखावे लागतात. पर्याय शोधावे लागतात. लगेच सुचलेली चाल करण्याचा मोह आवरावा लागतो. प्रतिस्पर्धी काय करेल याचा अंदाज घ्यावा लागतो.
आणि प्रत्येक निर्णयाची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते.
डाव जिंकला तर आनंद पचवायचा.
हरला तर निराशा पचवायची.
कुठे चूक झाली ते शोधायचे.
पुन्हा खेळायचे.
म्हणून बुद्धिबळाचा उपयोग केवळ बुद्धिबळ शिकवण्यासाठी न करता विचार करण्याची सवय लावण्यासाठी करता येईल.
मुलासाठी
फक्त जिंकायचे नाही.
विचार करून खेळायचे.
हरल्यानंतर शिकायचे.
जिंकल्यानंतरही शिकायचे.
बुद्धिबळ शिक्षकासाठी
फक्त पुढची चाल शिकवायची नाही.
मुलाला विचारायला लावायचे —
“तुला काय दिसतंय?”
“तुझ्याकडे कोणते पर्याय आहेत?”
“ही चाल केलीस तर पुढे काय होईल?”
“मागच्या डावातून काय शिकलास?”
शिक्षकाने उत्तर सांगण्यापेक्षा मुलाला उत्तर शोधायला लावणे अधिक महत्त्वाचे.
आई-वडिलांसाठी
प्रत्येक स्पर्धेनंतर पहिला प्रश्न —
“जिंकलास का?”
एवढाच नको.
त्याऐवजी कधीतरी विचारा —
“आज काय शिकलास?”
Rating, medal, trophy यांच्यापेक्षा मुलाची विचार करण्याची प्रक्रिया महत्त्वाची.
जिंकण्याचा आनंद त्याचा.
हरण्याचा अनुभवही त्याचाच.
दोन्हीतून शिकण्याची संधी त्याला द्या.
दहा ते वीस वर्षे हा विचार, निर्णय, भावनांवर नियंत्रण आणि स्वतःची ओळख घडण्याचा महत्त्वाचा काळ आहे.
या वयात बुद्धिबळ हे केवळ दोन खेळाडू आणि चौसष्ट घरांचा खेळ राहत नाही.
तो विचारांचा सराव बनू शकतो.
बुद्धिबळ मुलाला किती बुद्धिमान बनवते, यापेक्षा बुद्धिबळ मुलाला किती विचार करायला लावते—हा प्रश्न मला अधिक महत्त्वाचा वाटतो.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


