टीव्हीवरील विध्वंस -भयानक की सुंदर?

टीव्हीवरील विध्वंस – भयानक की सुंदर?

तीस वर्षांपूर्वीची गोष्ट.

माझा मराठी माध्यमात शिकणारा तरुण मुलगा टीव्हीवर इंग्रजी सिनेमा पाहत होता. उत्सुकतेपोटी मीही त्यात सामील झालो.

दृश्य भयंकर होते. पेटलेल्या गाड्या. धडाडणाऱ्या आगी. मोठमोठे स्फोट. हवेत उडणारी माणसं. रक्ताचे चिळकांडे.

माझ्या तोंडून सहज उद्गार निघाले —
“भयानक आहे हे सगळं!”

आणि मुलगा आनंदाने ओरडला —
“सुंदर!”

मी चमकलो.
याला यात सुंदर काय दिसलं?
मी विचारलं,
“अरे बाबा, मला तर हे भयानक वाटतंय. तुला यात सुंदर काय दिसलं?”
तो म्हणाला,

“बाबा, तू फार सरळ आहेस! हे खरं थोडंच आहे? सिनेमातलं आहे. खोटं म्हणूनच बघायचं असतं.
किती सुंदर शूटिंग केलंय! एका दृश्यात किती गोष्टी दाखवल्या आहेत! किती छान परिणाम साधलाय!”

मी थांबलो.
त्याला विध्वंस सुंदर वाटत नव्हता.
विध्वंसाचं चित्रण सुंदर वाटत होतं.

पडदा आणि वास्तव यातली सीमा त्याच्या मनात स्पष्ट होती.
आज, तीस वर्षांनंतर, त्या प्रसंगाचा आणखी एक अर्थ समजतो.

मोठं होणाऱ्या मुलांचं कल्पनेचं, कथेचं, खेळाचं, सिनेमाचं, Fantasy चं एक वेगळं जग असतं.

ते आपल्याला नवखं किंवा विचित्र वाटलं म्हणून धोकादायक ठरत नाही.

दोनच प्रश्न महत्त्वाचे —
मुलाला कल्पना आणि वास्तव यातला फरक समजतो का?

त्याचं वास्तवातील जगणं सुरळीत आहे का?

अभ्यास, मित्र, कुटुंब, झोप, जबाबदाऱ्या आणि वागणं सुरळीत असेल, तर घाबरण्याची घाई नको.

भांडू नका. चेष्टा करू नका. थांबवण्याची घाई करू नका.
फक्त विचारा —
“तुला यात काय दिसतं?”

तीस वर्षांपूर्वी मी तो प्रश्न विचारला.
मुलाला शिकवायला निघालेला बाप
त्या दिवशी मुलाकडूनच शिकला —
मुलाचे जग समजून घेण्यापूर्वी घाईने प्रतिक्रिया देऊ नये

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top