लहान मुलांना मोठे करणाऱ्या गोष्टी – समंजस, जबाबदार आणि कामाचा माणूस करणाऱ्या
LMG–009 — डोंगरातून रस्ता फोडणारे दशरथ मांझी
दशरथ मांझी.
बिहारमधल्या एका छोट्याशा खेड्यात राहणारा
एक गरीब मजूर. ना मोठं शिक्षण. ना पैसा.ना मोठी यंत्रं. ना त्याच्या हाताखाली काम करणारी माणसं. पण त्याच्या गावासमोर उभा होता—
एक मोठ्ठा डोंगर! गावात डॉक्टर नव्हते.
डॉक्टरकडे जायचं म्हटलं, तर डोंगराला मोठ्ठा वळसा घालून जावं लागायचं.
एकदा दशरथ मांझींची पत्नी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी वेळेत घेऊन जाता आलं नाही. आणि तिचा मृत्यू झाला. मांझींना फार मोठा धक्का बसला.
पण त्यांच्या मनात एक विचार आला—
हा डोंगर असाच राहिला, तर आज माझ्या बायकोचं झालं… उद्या दुसऱ्या कुणाचं होईल.
हे बदललं पाहिजे.
पण बदलणार कोण? सरकार? अधिकारी?
कुणीतरी दुसरा? दशरथ मांझींनी ठरवलं—
“मी!”
डोंगरातून रस्ता काढायचाच. लोकांना वाटलं—
हा एकटा काय करणार? एवढा मोठ्ठा डोंगर…
आणि हा एकटा माणूस! त्याच्याकडे ना JCB.
ना bulldozer. ना drilling machine.
हातात काय? हातोडा. छिन्नी. आणि प्रचंड जिद्द!
ठक्! ठक्! ठक्! दगडावर पहिला घाव.
दगड फुटला का? कदाचित नाही. पुन्हा—
ठक्! पुन्हा— ठक्! लोक हसायचे. काही जण त्याला वेडा म्हणायचे.
पण मांझी दुसऱ्या दिवशी पुन्हा यायचे. हातोडा उचलायचे. छिन्नी घ्यायचे. आणि— ठक्! ठक्! ठक्! एक दिवस. एक महिना. एक वर्ष. दोन वर्षं. पाच वर्षं. दहा वर्षं… आणि तरीही काम सुरूच! मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, दशरथ मांझी किती वर्षं हा डोंगर फोडत राहिले?
बावीस वर्षं! 22 YEARS! हातोडा आणि छिन्नी घेऊन—बावीस वर्षं!
आणि शेवटी… जिथे डोंगर होता, तिथे—
रस्ता तयार झाला! एका गरीब मजुराने स्वतःच्या दुःखाला फक्त दुःख म्हणून जपून ठेवलं नाही. त्याने त्याच दुःखातून— एक समस्या ओळखली. समस्येवर उपाय ठरवला.
आणि उपायासाठी काम करत राहिला. एक दिवस नाही. एक महिना नाही. एक वर्ष नाही.
बावीस वर्षं!

म्हणून दशरथ मांझींना लोक म्हणू लागले—“Mountain Man!”
पण मला त्यांच्या गोष्टीतली सर्वांत मोठी गोष्ट डोंगर वाटत नाही. सर्वांत मोठी गोष्ट होती—
त्यांची जिद्द. कारण डोंगर त्यांच्यासमोर उभा होता. पण दशरथ मांझींनी ठरवलं—डोंगर आहे म्हणून थांबायचं नाही. डोंगर आहे म्हणून— रस्ता काढायचा!
मुलांनो, आपल्या आयुष्यातही डोंगर येतात.
अभ्यास कठीण वाटतो. एखादी गोष्ट जमत नाही. खेळात हरतो. परीक्षेत कमी मार्क पडतात.
लोक हसतात. कधी परिस्थिती साथ देत नाही.
तेव्हा दोन पर्याय असतात—
डोंगराकडे बघत बसायचं…की—आपला रस्ता आपण तयार करायचा!
दशरथ मांझींची गोष्ट आपल्याला सांगते मोठा बदल घडवायला, तुम्ही मोठे असण्याची गरज नाही. पण तुमचा निर्धार मोठा असायला हवा.
आणि लक्षात ठेवा—डोंगर किती मोठा आहे,
यापेक्षा…तुम्ही हातोडा किती वेळा उचलता, हे महत्त्वाचं!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


