LMG–011
दोन्ही हात नाहीत, तरी नेमबाजीत जगज्जेता!
मॅट स्टुटमन — जिद्दीने लक्ष्य गाठणारा धनुर्धर
मॅट स्टुटमन अमेरिकेत जन्मला. जन्मतःच त्याला दोन्ही हात नव्हते.
पण त्याने आपल्या पायांनाच हात बनवले.
पायांनी जेवायचं. पायांनी लिहायचं. रोजची अनेक कामं पायांनीच करायची.
आणि एक दिवस त्याने ठरवलं, आपण धनुर्विद्या शिकायची!
धनुष्य हातात धरून बाण मारणं सोपं नसतं. मग हातच नसताना धनुष्यबाण चालवायचा कसा?
मॅटने स्वतःची पद्धत शोधली. पायाने धनुष्य धरायचं. पाय आणि खांद्याच्या मदतीने प्रत्यंचा ताणायची. विशेष यंत्रणेच्या साहाय्याने बाण सोडायचा.
सुरुवातीला त्यालाही अडचणी आल्या. पण त्याने सराव सोडला नाही. चुका सुधारल्या. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले.
आणि २०१५ साली त्याने तब्बल २८३ मीटर अंतरावरून बाण मारून लक्ष्य भेदलं!
हा जागतिक विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला.
पुढे २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने सुवर्णपदकही जिंकलं.
जन्मतः दोन्ही हात नसलेला मुलगा जगज्जेता धनुर्धर झाला!
मॅटच्या आयुष्यात अडचणी नव्हत्या असं नाही. पण अडचणींवर उपाय शोधण्याची त्याची तयारी होती.
आपल्यात काय कमी आहे, यापेक्षा आपल्यात जे आहे, त्याचा उपयोग आपण कसा करतो, हे अधिक महत्त्वाचं असतं.
संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. काहींवर मात करता येते. काहींशी जुळवून घ्यावं लागतं. गरज पडली तर दुसऱ्यांची मदतही घ्यावी लागते.
पण प्रयत्न करण्याचं थांबवायचं नसतं.
जिद्द म्हणजे संकट नसणं नव्हे; संकट असतानाही पुढे जाण्याचा मार्ग शोधणं!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


